अतिताण, मधुमेहाच्या आजारांमुळेच कोरोना रुग्णांचा मृत्यू

मुंबईतील आतापर्यंतच्या मृतांच्या विश्लेषणनुसार मधुमेह आणि अतिताण एकत्र आजार असल्याने ३२ टक्के, मधुमेहामुळे २७ टक्के आणि अतिताण असल्यामुळे २२ टक्के असे कोरोना सोबत इतर आजारांचे प्रमाण दिसून आले आहे.

कोरोनाच्या रुग्णांचे मृत्यू हे मधुमेह आणि अतिताण या आजारांमुळेच अधिक झाल्याची बाब मृतांच्या विश्लेषणानुसार समोर आली आहे. मुंबईतील आतापर्यंतच्या मृतांच्या विश्लेषणनुसार मधुमेह आणि अतिताण एकत्र आजार असल्याने ३२ टक्के, मधुमेहामुळे २७ टक्के आणि अतिताण असल्यामुळे २२ टक्के असे कोरोना सोबत इतर आजारांचे प्रमाण दिसून आले आहे. त्यामुळे इतर आजार असलेल्या नागरिकांनी आपापल्या परीने योग्य काळजी घ्यावी, नियमितपणे औषधे घ्यावीत, असे जाहीर आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

मुंबईतील कोरोना बाधित मृत्यूचा दर हा यापूर्वीच नियंत्रणात आला असून तो आता राष्ट्रीय सरासरीच्या जवळ आहे. त्यामुळे मृतांचे आकडे स्पष्ट सांगितले जात नसल्याचा आक्षेप देखील निकाली निघतो. १८ ते २४ मे या कालावधीत २८० इतके कोरोना बाधित रुग्ण दगावले. हीच संख्या २५ ते ३१ मे या कालावधीत २७० आहे. याचाच अर्थ मुंबईतील कोरोना बळींची संख्या वाढलेली नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.

क्वारंटाईनमुळेच १२ विभाग कार्यालयांच्या हद्दीत रुग्णवाढीचा दर कमी झाला

कोरोना बळींची संख्या स्पष्ट दर्शवून त्यांच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींचे विलगीकरण करण्यात यावे, असा आग्रह धरला जात आहे. परंतु कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबाबत कोणतीही आकडेवारी लपवली जात नाही किंवा त्याच्याशी छेडछाड केली जात नाही. कोरोना बाधित व्यक्तींच्या नजीकच्या व अती जोखमीच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींचे अलगीकरण अर्थात क्वारंटाईन करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. यामुळेच मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी १३ वरून आता १६ दिवस इतका झाला आहे. मुंबईतील एकूण २४ पैकी १२ प्रशासकीय विभागांची कामगिरी या सरासरीपेक्षा देखील अधिक सरस आहे. हे सर्व अलगीकरण कार्यवाहीवर जोर दिल्यामुळे साध्य झाले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पोलिसांना ताब्यात दिलेल्या मृतदेहांच्या विल्हेवाटीचे व्हिडीओ प्रसारीत करण्यास बंदी

कोविड बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास निश्चित नियमावलीनुसार सर्व प्रक्रिया करून, निर्जंतुकीकरण करून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह दिला जातो. काही प्रसंगी नातेवाईकांशी संपर्क होईपर्यंत मृतदेह हस्तांतरण करण्यास अधिक वेळ लागतो. किंवा नातेवाईकांशी संपर्क होऊ शकला नाही तर पोलिस प्रशासनाकडे मृतदेह ताब्यात देण्याची प्रक्रिया पार पाडावी लागते. अशा प्रसंगांची छायाचित्रे व व्हिडिओ प्रसारित करू नयेत, असे आवाहन वारंवार केले जात असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

शववाहिकांची गर्दी कमी करण्यासाठी स्मशानात कोविडच्या मृतदेहांसाठी जागा

तसेच महानगरपालिकेच्या शववाहिनीतून रुग्णाचा मृतदेह थेट स्मशानभूमीमध्ये पाठवला जातो. अनेकदा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्काराची तयारी होईपर्यंत शववाहिका वाहनात मृतदेह राखून ठेवला जात असे. अशा कारणांनी स्मशानभूमीमध्ये शववाहिका अडकून राहू नये, तसेच शववाहिकेला विलंब होऊ नये म्हणून स्मशानभूमीत स्वतंत्र भागात कोरोना बाधित रुग्णांचे मृतदेह ठेवून योग्य प्रक्रियेनिशी अंत्यसंस्कार करण्यात येतात. शववाहिकेतून मृतदेह काढून त्या स्वतंत्र भागात मृतदेह ठेवले जातात आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात.