घरमुंबईमुंबईत दरमहा २७०० हून अधिक पक्षांचा अपघाती मृत्यू

मुंबईत दरमहा २७०० हून अधिक पक्षांचा अपघाती मृत्यू

Subscribe
एकीकडे मुंबईतील विविध विकास कामांसाठी करण्यात आलेल्या बेसुमार वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे, तर  दुसरीकडे उंच इमारतीं तसेच वाहनांना धडकून, इमारतीना लावण्यात आलेल्या खिडक्यांच्या जाळ्यामध्ये तसेच नायलॉनच्या धाग्या अडकून, उंदरांसाठी ठेवण्यात आलेली विषारी औषधे अन्न म्हणून खावून  अशा विविध कारणांनी प्रत्येक महिन्याकाठी 2700 हून अधिक पक्ष्यांचा अपघाती मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत मुंबईतील पक्षांसाठी काम करणाऱ्या बर्ड हेल्पलाईन या संस्थेने दिलेल्या माहिती नुसार मुंबई शहरात नोंद आकडेवारी नुसार दररोज 80 ते 90  पक्षांचा अपघाती मृत्यू होतो तर 100 हून अधिक पक्षी हे गंभीर रित्या जखमी होतात. हे प्रमाण चिंताजनक आहे. परंतु याची फारशी कोण गांभीर्याने दखल घेताना दिसत नाही.
बर्ड हेल्पलाईन अशा अपघातात जखमी झालेल्या पक्ष्यांवर मोफत उपचार करुन त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडून देते. याबाबत अधिक माहिती देताना बर्ड हेल्पलाईन संस्थेचे सदस्य डॉ. हर्षा शहा म्हणाले मुंबई शहरात विविध कारणांनी पक्ष्यांचा अपघाती मृत्यू होण्यासोबतच सध्या वाढत्या उन्हाळ्यामुळे पक्षांच्या मृत्यूचा आकडाही वाढला आहे. त्यातच प्रचंड उष्णता आणि पाण्याअभावी देखील या पक्षांचे मृत्यू होत आहेत. यामध्ये चिमणी, कावळा, वटवाघूळ, पोपट, कोकीळ, कबूतर यापक्ष्यांचा अधिक समावेश आहे. यापैकी वाढत्या उष्णतेमुळे पोपटांचा मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
रहिवाशी इमारतींना लावण्यात आलेल्या जाळ्यांमुळे सर्वाधिक पक्षांचे मृत्यू
विविध विकास कामांसाठी करण्यात आलेल्या बेसुमार वृक्षतोडीमुळे सध्या मुंबईतील पक्ष्यांचा नैसर्गीक अधिवास संपुष्ठात येत आहे. त्यामुळे साहजिकच वृक्षतोडीमुळे बेघर झालेले पक्षी साधारण इमारतीच्या गॅलरी तसेच खिडक्यांशेजारी आसरा घेतात, परंतु  इमारतींमधील रहिवाशांना या पक्ष्यांचा त्रास वाटत असल्याने अनेक रहिवाशांनी आपल्या इमारतीच्या गॅलरी व खिडक्यांना जाळ्या बसवून घेतल्या आहेत. परंतु या जाळ्यात अडकून पक्षांचे सर्वाधिक मृत्यू होत असल्याने अशा जाळ्याच पक्ष्यांच्या मृत्यूचा सापळा बनत असल्याचे डॉ.शहा यांनी सांगितले.
बेसुमार वृक्षतोडीमुळे मुंबईतील पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास संपुष्टात
सध्या मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्पाचे काम जोरात सुरु आहे. परंतु या कामासाठी मुंबईच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. नरिमन पॉईंट, चर्चगेटपासून ते प्रभादेवीपर्यंत सर्व ठिकाणी उंच, डेरेदार वृक्ष या मेट्रोच्या कामासाठी इलेक्ट्रिक मशिनने कापण्यात आले आहेत.. त्यामुळे साहजिकच येथील पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे. याचा परिणाम त्यांची शहरातील संख्या घटण्यावर होत आहे.
निकृष्ठ अन्नामुळे पक्ष्यांच्या आरोग्यावर परिणाम
माणसांप्रमाणे या पक्षांच्या देखील अन्न ,पाणी व निवारा या गरजा आहेत. परंतु या गरजांसाठी संघर्ष करताना या पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. मुंबईच्या अनेक भागात पक्ष्यांसाठी पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नाही, तसेच लोकांनी टाकलेले पॉपकॉर्न, तेलकट, तिखट चिप्स, बिस्किटे, खराब व टाकून दिलेले अन्न हे पक्षी खात असल्याचे दिसून येते. त्यामुळे या पक्ष्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे डॉ. शहा यांनी सांगितले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -