घरमुंबईप्रभादेवीमधील झाडे राडारोडाच्या विळख्यात

प्रभादेवीमधील झाडे राडारोडाच्या विळख्यात

Subscribe

मुंबईच्या विविध भागांतून नागरिक नोकरी व व्यवसायानिमित्ताने प्रभादेवी परिसरात येत असतात. त्यामुळे या भागात लोकवस्तीचा प्रचंड विस्तार झाला आहे. दररोज नोकरदार वर्ग आपल्या रोजीरोटीसाठी, वेगवेगळ्या कामांसाठी येथे येत असून, या ठिकाणी वाहतुकीची वर्दळ जास्त असते. मात्र या नारिरकांच्या जिवाला झाडांमुळे धोका असल्याचे समोर आले आहे. या परिसरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर मोठ-मोठी झाडे आहेत. मात्र ती सर्व झाडे राड्यारोड्याच्या विळख्यात सापडली आहेत. झाडांच्या मुळाशी दगड, माती, विटा, सिमेंटच्या पोती अशा वस्तू टाकण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी ही झाडे झुकलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून येत असून, येत्या पावसात ही झाडे कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.

गेल्या वर्षी चेंबूरच्या स्वस्तिक पार्क येथे नारळाचे झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला होता. कांचन नाथ (५८) असे या महिलेचे नाव असून, ती मॉर्निंग वॉकसाठी गेली होती. त्यावेळी ही घटना घडली. या महिलेच्या अंगावर झाड कोसळल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हळहळ व्यक्त करून हात झटकले होते. मात्र हीच परिस्थिती पुन्हा प्रभादेवी परिसरात उद्भवणार असल्याचे दिसून येते आहे. प्रभादेवीमधील रस्ताच्या आजूबाजूला वड, पिंपळ, आंबा अशी मोठ मोठी झाडे लावण्यात आलेली आहेत. ही सर्वच झाडे राडारोड्याच्या विळख्यात असल्याचे दिसून येत आहे. प्रभादेवी परिसरातील खेडगल्ली, आप्पासाहेब मराठे मार्ग, मराठे उद्योग भवन, धनमिल नाका या ठिकाणी असलेल्या झाडांच्या मुळाशी मोठ्या प्रमाणात दगड, माती, सिमेंटची पोती टाकण्यात आली आहेत. या झाडांना मोकळा श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. रस्त्याच्या कडेला असलेली ही झाडे साधारणतः २५ ते १०० वर्षे अशा वयाची आहेत. वडाची व पिंपळाची झाडे सर्वात जुनी असून त्यांच्या खोडांनी पदपथाचा बराचसा भाग व्यापला आहे. तर काही झाडांचे खोड मोठ्या प्रमाणात पसरल्याने तेथील सिमेंटचा कट्टा तोडून हे खोड बाहेर पसरले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यापूर्वी अशा झाडांची महापालिकेकडून पाहणी करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

भितीचे सावट 

गेल्या वर्षी झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला होता. यापूर्वी सिध्दिविनायक या ठिकाणी देखील झाड कोसळून माणसाला आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच येत्या पावसात देखील झाड कोसळून कोणाचा मृत्यू तर नाहीना होणार अशी भिती निर्माण होत आहे.

– निलेश निकम, नागरिक

निगा राखत नाहीत

- Advertisement -

मुंबई महापालिकेला पदपथावरील झाडांमधील दगड, माती, सिमेंट हे काढून त्या ठिकाणी झाडाचे संगोपन करण्याकरता एक लाख रुपयांचे टेंडर दिले जाते. या टेंडरच्या माध्यमातून खत, पाणी आणि त्या झाडाला ओसा बांधण्याकरता निधी दिला जातो. मात्र नागरिकांकडून तक्रार येत नाही तोपर्यंत महापालिका त्याची निगा राखत नाही. त्यामुळे झाड कोसळून अपघात होतात.

– अभिजीत पाटील, युवा सेना उपविभाग प्रमुख

येत्या सोमवारी करणार पहाणी

मुंबईतील काही झाडांच्या मुळाशी मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकण्यात आले असून अशी झाडे आमच्या निर्दशनास आली आहेत. या झाडांची येत्या सोमवारी पहाणी करुन योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.

– जितेंद्र परदेशी, उद्यान विभाग प्रमुख

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -