मुंबईत १ ऑगस्टपासून घरोघरी लसीकरण होणार, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

मुंबईत ७५ वर्षांवरील अंतरुणाला खिळलेल्या ज्येष्ठ नागरीकांसाठी मुंबई महानगरपालिका घरोघरी जाऊन लसीकरण करणार

decision of Mumbai Municipal Corporation Vaccination will be done at home in Mumbai from August 1
मुंबईत १ ऑगस्टपासून घरोघरी लसीकरण होणार, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

मुंबईतील लसीकरण वेगाने करण्यासाठी महानगरपालिका आणि राज्य सरकारने हालचाली सुरुच ठेवल्या आहेत. आता १ ऑगस्टपासून मुंबईत ७५ वर्षांवरील अंतरुणाला खिळलेल्या ज्येष्ठ नागरीकांसाठी मुंबई महानगरपालिका घरोघरी जाऊन लसीकरण करणार आहे. मुंबई महानगरपालिकेची ही विशेष मोहीम असणार आहे. राज्य सरकारने याबाबत हायकोर्टाला माहिती दिली असून न्यायालयानं राज्य सरकारच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आहे. मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या ज्येष्ठ नागरीकांना लसीकरण करण्यासाठी महानगगपालिकेकडे अनेक नोंदी आल्या आहेत यामुळे महानगरपालिका सज्ज झाली आहे.

मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार वेगाने लसीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवत आहेत. परंतु गंभीर आजार असलेले आणि अंथरुणाला खिळलेल्या नागरीकांना लसीकरण केंद्रापर्यंत येणं शक्य नसल्यामुळे या नागरीकांचे घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात यावे अशी मागणी केली जात होती. मुंबई महापालिकेकडे सध्या ३५०५ जेष्ठ नागरीकांची घरच्या लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका घरोघरी लसीकरण करण्यासाठी आदेशाच्या प्रतिक्षेत होती परंतू आता उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्यामुळे मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार संयुक्तपणे घरोघरी लसीकरण मोहीम राबवणार आहे.

१ ऑगस्टपासून मुंबईतील जेष्ठ नागरीकांसाठी दारोदारी जाऊन लसीकरण करण्याबाबत राज्य सरकारचं धोरण तयार झालं आहे. आता अंतिम मसूदा लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती राज्य सराकरने हायकोर्टात दिली आहे. यावर “केंद्र सरकारला याबाबतीत अजुनही जाग आलेली नाही, मात्र राज्य सरकार जागं झालं याचं आम्हाला समाधान” असे विधान उच्च न्यायालयाने केलं आहे. मुंबई महानगरपालिका ७५ वर्षांवरील अंथरूणावर खिळलेल्या जेष्ठ नागरीकांसाठी मुंबईत १ ऑगस्टपासून घरोघरी लसीकरणास सुरुवात करणार आहे.