कोरोनाकाळात बेस्टच्या वीज चोरीच्या प्रकरणांत घट

Electricity customer can complain via missed call

कोरोना काळात बेस्टची वीज चोरी करणे, मीटरमध्ये फेरफार करणे किंवा थेट जोडणी करुन फुकटात वीज घेणे अशा वीज चोरी करणार्‍यांना आळा घालण्यासाठी बेस्टकडून युध्दपातळीवर जनजागृती आणि कारवाई मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे यंदा वीज चोरी करणार्‍यांमध्ये मोठा प्रमाणात घट झाली आहे. गेल्या वर्षी 1 हजार 394 वीजचोरी प्रकरणे सापडली होती. यंदा मात्र वीज चोरीची ७२२ प्रकरणे सापडली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 50 टक्के वीज चोरीच्या घटना कमी झालेल्या आहेत.

बेस्टच्या मोहिमेला यश

बेस्ट उपक्रमाकडून मुंबईत वीज पुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून वीज चोरीच्या घटना वाढत होत्या. त्यामुळे बेस्टला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा फटका बसत होता. बेस्टने वीज चोरीच्या घटनेत आळा घालण्यासाठी तसेच आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्ट उपक्रमाला सावरण्यासाठी बेस्टच्या विद्युत विभागाने युध्दपातळीवर जनजागृती केली. सोबतच बेस्टच्या विद्युत विभागातील दक्षता अधिकार्‍यांनी कारवाई मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे बेस्टच्या वीज चोरीच्या घटनांमध्ये कमतरत आलेली आहेत. कोरोना काळातसुध्दा बेस्टकडून वीज चोरी करणार्‍यांवर कारवाई केली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबरमध्ये मीटरमध्ये फेरफार करण्याचे  234 प्रकरण सापडले होते. तर यंदा त्यांची संख्या 64 वर आली आहे. तर थेट जोडणी करुन फुकटात वीज घेण्याचे प्रकरण गेल्या वर्षी  759 प्रकरण सापडले होते. तर यंदा ती संख्या 511 वर आली आहे. इतकेच नव्हेतर सर्व प्रकारचा वीज चोरीच्या घटनेतील कमतरता आल्याने बेस्टच्या महसुलातसुध्दा वाढ झाली आहे.

कोरोनात 3 कोटी 90 लाखांची कमाई

बेस्ट उपक्रमाने कोरोना काळातसुध्दा अखंडित विद्युत सेवा देण्याचे काम केले आहे. विद्युत विभागाच्या कर्मचार्‍यांनी रात्रंदिवस काम केल्यामुळे संकटकाळात मुंबईकरांना विद्युत सेवेत खंड पडला नाही. तसेच कोरोना काळात वीज चोरीच्या तक्रारी बेस्टकडे आल्या होत्या. त्यानुसार वीज चोरी करणार्‍या ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे. यंदा बेस्टच्या विद्युत विभागाला वीज चोरीची 722 प्रकरणे  सापडली आहेत. त्यांच्यावर 3 कोटी 90 लाख रुपयांच्या दंडापैकी आतापर्यंत 2 कोटी 50 लाख रुपये वसूल केले आहेत.

वीज चोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून युध्दपातळीवर जनजागृती केली. तसेच बेस्टच्या विद्युत विभागाकडून सतत केलेल्या कारवाईमुळे यंदा वीज चोरीच्या प्रकरणांत घट झाली आहे. वीज चोरीचा आकडा शुन्यावर आण्यासाठी बेस्ट उपक्रम  प्रयत्न करत आहे.  
– मनोज वराडे, जनसंपर्क अधिकारी, बेस्ट उपक्रम