घरमुंबई२६१ निकालांची प्रतिक्षा कायम निकाल घोषणेकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष

२६१ निकालांची प्रतिक्षा कायम निकाल घोषणेकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष

Subscribe

मुंबई विद्यापीठाच्या गेल्यावर्षी लागलेल्या निकाल गोंधळाच्या पार्श्वभूमीवर यंदाही सर्व विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष उन्हाळी सत्र परीक्षांच्या निकालाकडे लागले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या गेल्यावर्षी लागलेल्या निकाल गोंधळाच्या पार्श्वभूमीवर यंदाही सर्व विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष उन्हाळी सत्र परीक्षांच्या निकालाकडे लागले आहे. विद्यापीठाने आतापर्यंत जवळपास सर्वच महत्वाच्या निकालाची घोषणा केली असली तरी आणखी जवळपास २६१ अभ्यासक्रमांचे निकाल शिल्लक असल्याने या निकालाची घोषणा कधी होते? याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाने रविवारपर्यंत २२९ परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे उर्वारित निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी ऑनलाइन असेसमेंट पध्दत सुरु केली होती. सरसकट सर्व शाखांच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी सुरु करण्यात आलेल्या या पध्दतीतील त्रुटीमुळे गेल्यावर्षी लाखो विद्यार्थ्यांना असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात आले होते. त्यातच यंदाही विद्यापीठाने ऑनलाइन असेसमेंटच्या माध्यमातूनच उत्तरपत्रिकांच्या तपासणीचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी पालकांनी निकालासाठी जीव मुठीत ठेवला असून यात प्रामुख्याने लॉ शाखेच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान, आता विद्यापीठाने बीए, बीकॉम आणि बीएस्सीसारख्या महत्वपूर्ण निकालाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता उर्वारित निकालांकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येते. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार यंदा सुमारे ४९० अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी आतापर्यंत २२९ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान, परीक्षा व मूल्यमापन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यंदा विद्यापीठाने एकूण ४९० परीक्षा घेतल्या आहेत. त्यात आर्टस शाखेच्या ४५, कॉमर्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट शाखेच्या ९५, सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीच्या २१९ आणि इंट्रडिसिप्लेनरी स्टडीजच्या १३१ परीक्षांचा समावेश आहे. या सर्व अभ्यासक्रमांच्या एकूण १६ लाख ६२ हजार उत्तरपत्रिकांचा समावेश असून या उत्तरपत्रिका तपासण्याचे प्रमुख आव्हान यंदा मुंबई विद्यापीठावर आहे. या सर्व उत्तरपत्रिका वेळेवर तपासण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरु आहे. जवळपास ८० टक्के उत्तरपत्रिका तपासण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन विभागाने दिली आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही महत्वपूर्ण निकालाची घोषणा केली जाणार असून यंदा अनेक निकाल विद्यापीठाने मुदतीच्या आत जाहीर केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिंता करु नये , असे आवाहन यावेळी विद्यापीठाने केले आहे.

यंदा कोणतीही निकाल उशीराने लागणार नाहीत. सर्व निकाल नियमानुसार ४५ दिवसांच्या आत लागतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारे चिंता करु नये.
डॉ. अर्जुन घाटुळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, संचालक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -