‘आता शरद पवार, संजय राऊतांची तोंडं शिवली आहेत का?’ भाजपचा परखड सवाल!

mlc election 2022 joint group of ashish shelar and sharad pawar in mumbai cricket association

दिल्लीत २६ जानेवारी रोजी शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून आता भाजपकडून राज्यात महाविकासआघाडीला टार्गेट करण्यात येत आहे. भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत आणि महाविकासआघाडी सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. तसेच, या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘शेतकरी आंदोलनामध्ये वेगळ्या शक्तींचा वावर आहे हे आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो. आता शरद पवार, संजय राऊत यांची तोंडं का शिवली आहेत? असा सवाल आम्ही करत आहोत. पुरस्कार वापसी आणि त्यांचं समर्थन हीच भूमिका शहरी नक्षलवाद्यांनी घेतली आहे. देशातल्या मोदी विरोधकांनी घेतली आहे. जेएनयूमध्ये बरसी साजरी होते, त्याला विरोध केला तर दिवसेंदिवस आंदोलन केलं जातं. सीएए कायद्याविरोधात आंदोलन केलं जातं. मोदी द्वेषापोटी या देशात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना अराजक आणू पाहात आहे’, असं ते म्हणाले.

‘शरद पवारांकडून माथी भडकवणं अपेक्षित नाही’

दरम्यान, यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी शरद पवारांवर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला. ‘दिल्ली पोलीस आणि जवानांनी जो परमोच्च कोटीचा संयम दाखवला, तो त्यांच्या देशभक्तीचा परिचय होता. विरोधकांना गोळीबार हवा होता का? माथी भडकवण्याचं काम शरद पवारांकडून अपेक्षित नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं संयमाची भाषा करू नये. माथेफिरूंचे समर्थक म्हणून काम करू नये. पोलिसांनी दोषींसोबतच माथेफिरूंचं समर्थ करणाऱ्यांपर्यंतही पोहोचावं. पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणं हे कोणत्या देशभक्तीत बसतं ते शरद पवार, संजय राऊतांनी स्पष्ट करावं. आंदोलनाला तीव्र रुप देणाऱ्यांची चौकशी व्हायलाच पाहिजे. पण ज्यांनी याचं समर्थन केलं, त्यांचीही चौकशी व्हायला हवी’, असं ते म्हणाले.