ड्रीम्स मॉल दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी

स्थायी समिती बैठकीत तीव्र पडसाद माजी व विद्यमान आयुक्तांच्या चौकशीची मागणी भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Bhandup's 'Dreams Mall'
ड्रीम्स मॉल दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी

भांडुप येथील ड्रीम्स मॉलमधील आगीची घटना व त्यामुळे मॉलमधील सनराईज रुग्णालयातील ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी. या मॉलला ओसी नसताना त्यामध्ये रुग्णालय सुरू करण्यास परवानगी देणारे माजी आयुक्त व या गंभीर प्रकरणी दुर्लक्ष करणारे विद्यमान आयुक्त यांची सखोल चौकशी करावी. तसेच, भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव, समाजवादी पक्षाचे गटनेते व आमदार रईस शेख यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत केली.

भांडुप येथील ड्रीम्स मॉलमधील गंभीर दुर्घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. या दुर्घटनेला माजी व विद्यमान आयुक्त , तत्कालीन उपायुक्त, संबंधित खात्याचे अधिकारी हे जबाबदार असल्याचा आरोप यावेळी सर्व पक्षीय गटनेते, सदस्य यांनी केला.

यावेळी, विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे या गंभीर विषयावर जोरदार चर्चा घडवून आणली.त्यांनी या प्रकरणी निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करण्याची व दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी पाठींबा देत ती मागणी उचलून धरली.

तसेच, या मॉलला ओसी नसताना तेथे रुग्णालय चालविण्यास परवानगी देण्यात माजी आयुक्त व या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करणारे विद्यमान आयुक्त इकबाल चहल हे दोघेही जबाबादार आहेत, असा आरोप रवी राजा, रईस शेख यांनी यावेळी केला. भांडुप येथील दुर्घटनेला अग्निशमन दलाचे व बिल्डिंग प्रपोजल विभागाचे संबंधित अधिकारीही कारणीभूत असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला. असे भ्रष्ट अधिकारी जेव्हा ५० लाख ते१ कोटी रुपये घेऊन बेकायदेशीर कामे करतात त्यामुळेच अशा दुर्घटना घडतात, असे रवी राजा म्हणाले.

भांडुप येथील दुर्घटनेला पालिकेतील भ्रष्ट अधिकारी जबाबदार आहेत. भाजपच्या नगरसेविका साक्षी दळवी यांनी अगोदरच या मॉल व रुग्णालयाप्रकरणी तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून कडक कारवाई न केल्यास भाजप कोर्टात धाव घेऊन दाद मागेल, असा इशारा भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी यावेळी प्रशासनाला दिला.

संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा – यशवंत जाधव

भांडुप दुर्घटना गंभीर असून याप्रकरणी सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यात यावा. तसेच, जे कोणी वरिष्ठ, कनिष्ठ अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.
तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मॉलवरही कडक कारवाई करण्यात यावी, असे आदेशही यशवंत जाधव यांनी दिले.

तसेच, वरळी अट्रीया मॉलमधील बेकायदा बांधकामांची चौकशी करून त्यावर कडक कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले.