मुंबईत गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची मागणी लागली जोर धरू

लोकप्रतिनिधींकडूनही आता कृत्रिम तलावांसाठी प्रयत्न

demand for artificial lakes for immersion of Ganesha in Mumbai
गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समुद्र चौपाट्यांसह प्रमुख विसर्जन स्थळांवरील गणेश भक्तांची गर्दी टाळण्यासाठी जास्तीत जास्त कृत्रिम तलाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे. सरकार आणि महापालिका यांच्याकडून अद्याप धोरण स्पष्ट नसल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश भक्तांसाठी लोकप्रतिनिधींकडून अशाप्रकारे कृ़त्रिम तलाव बनवण्याची मागणी होत आहे. शिवसेनेने माजी आमदार अरविंद नेरकर आणि एम-पश्चिम विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्ष आशा मराठे यांनी खेळाची मैदाने, मोकळ्या जागांसह सर्व गृहनिर्माण सोसायट्या, बैठ्याचाळींसह झोपडपट्टयांच्या परिसरांमध्ये कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याची मागणी मुख्यमंत्री तसेच महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गिरगाव येथील शिवसेनेचे माजी आमदार अरविंद नेरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून यंदा सार्वजनिक विसर्जन ठिकाणी गर्दी टाळणे आवश्यक असल्याचे नमुद करत कमीत कमी भाविक चौपाटीवर कशाप्रकारे कमी होतील यादृष्टीकोनातून नियोजन होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गणेश भक्तांना जवळच्या ठिकाणी कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी केली. यासाठी खेळाचे मैदान, क्रिडांगणे, वाहतूक तळ, मोकळे भूखंड, आदी ठिकाणी नियमांच्या आधीन राहून कृत्रिम तलाव बांधून दिल्यास जवळपासच्या नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल आणि पर्यायाने चौपाट्यांवरील गर्दी कमी होईल, असे निवेदनात म्हटले आहे.

एम- पश्चिम विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा आशा मराठे यांनी गणेश मूर्ती विसर्जनासाठी नागरिक एकत्रपणे मुंबईतील गिरगाव, शिवाजीपार्क इत्यादी विसर्जन स्थळांवर मोठ्या संख्येने जमण्याची शक्यता लक्षात घेता, मोठ्या गणेश मंडळांकरिता तसेच सर्व गृहनिर्माण सोसायट्या आणि बैठ्या चाळी, झोपडपट्टीवासियांसह मंडळांच्या सचिव व अध्यक्षांना त्यांच्या सोसायटीच्या अथवा ठराविक ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याचे निर्देश प्रशासनाने द्यावेत अशी मागणी केली आहे. या कृत्रिम तलावांचे बांधकाम व निर्माल्य वाहून नेण्यासाठी योग्य ते अनुदान देण्याची सूचना त्यांनी केली आहे.

मुंबईत २००७ मध्ये तत्कालिन महापौर डॉ. शुभा राऊत यांनी कृत्रिम तलावांची पहिली संकल्पना मांडली होती. त्यानंतर या कृत्रिम तलावांच्या निर्मितीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. सुरुवातील १६ कृत्रिम तलावांची निर्मिती केली असली मागील वर्षी ही संख्या ३४ एवढीच होती. त्यामुळे १३ वर्षांमध्ये केवळ १८ कृत्रिम तलाव महापालिकेला वाढवता आलेली आहे. याबाबत यापूर्वी प्रशासनाने योग्यप्रकारे जनजागृती केली नसल्याने ही संख्या कमी झाली होती. परंतु यंदा ही संख्या ७५ ते १०० पर्यंत वाढवता येण्यासारखी असून याला खुद्द लोकप्रतिनिधींची साथ असल्याने प्रशासन यासाठी किती प्रयत्न करते याकडे सर्वांचे लक्ष आहे.