घरमुंबईशरद पवारांना 'भारतरत्न' द्या; ठाण्यात राबवली सह्यांची मोहीम

शरद पवारांना ‘भारतरत्न’ द्या; ठाण्यात राबवली सह्यांची मोहीम

Subscribe

तीन तासांच्या या स्वाक्षरी मोहीमेमध्ये सुमारे ९ हजार ७२० नागरिकांनी सहभाग घेत स्वाक्षरी करुन शरद पवारांना 'भारतरत्न' देण्याबद्दल अनुकूलता दर्शवली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना ‘भारतरत्न’ किताबाने सन्मानित करण्यात यावे. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ठाणे रेल्वे स्थानक येथे सह्यांची मोहीम राबविण्यात आली. ठाणे रेल्वे स्थानक येथे फलाट क्रमांक १ च्या बाहेर ही मोहीम राबवण्यात आली. विशेष म्हणजे, ठाणेकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे कार्यकर्त्यांना गाठून स्वाक्षरी करीत शरद पवार यांना ‘भारतरत्न’ किताबाने सन्मानित करावे, अशी मागणी केली. तीन तासांच्या या स्वाक्षरी मोहीमेमध्ये सुमारे ९ हजार ७२० नागरिकांनी सहभाग घेत स्वाक्षरी करुन शरद पवारांना ‘भारतरत्न’ देण्याबद्दल अनुकूलता दर्शवली.

हेही वाचा – लोकलच्या गर्दीचा आणखी एक बळी; डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू

…ही तर सर्वसामान्यांची इच्छा

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे ठाणे अध्यक्ष कैलास हावळे यांनी ही मोहीम राबवली. यावेळी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले की, “शरद पवार हे गेली ५२ वर्षे महाराष्ट्र आणि देशाच्या उत्कर्षासाठी झगडत आहेत. सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना त्यांनी देशातील अनेक संविधानिक पदे भूषविली असून त्यांच्यामुळेच या पदांचा सन्मानही वाढला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवताना त्यांनी महाराष्ट्राला विकसीत राज्यांच्या रांगेत बसवले आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण त्यांच्याच योगदानामुळे झाली आहे. संरक्षण मंत्रीपदाच्या काळात त्यांनी भारताच्या सीमारेषांवरील घुसखोरी आटोक्यात तर आणलीच होती. शिवाय, सियाचीनसारख्या सर्वात उंच युद्धभूमीला भेट देऊन त्यांनी भारतीय सैन्याचे मनोबल वाढवले होते. भारताच्या सैन्यदलाला सक्षम करण्याची सुरुवात त्यांच्याच कार्यकाळात झाली होती. तर, कृषीमंत्रीपदाच्या कार्यकाळात कर्जबाजारी झालेल्या शेतकर्‍याला सक्षम करण्यासाठी अनेक योजना आणि उपक्रम त्यांनी राबविले. त्यांच्याच कार्यकाळात भारतातून अन्नधान्याची सर्वाधिक निर्यातही झाली होती. याशिवाय अनेक सामाजिक, क्रीडा, शिक्षण आदी क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामांचा ठसा जागतिक पातळीवर उमटला आहे. त्यामुळेच त्यांना ‘भारतरत्न’ देऊन गौरविण्यात यावे, अशी ठाण्यातील राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -