गुंदवली ग्रामस्थांची पूर्णा ग्रामपंचायतीकडे डम्पिंग ग्राऊंड हटवण्याची मागणी

शिष्टमंडळाने पूर्णा ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा खंडागळे यांना डम्पिंग ग्राऊंड हटविण्याबाबत लेखी निवेदनातून मागणी केली.

Demand for removal of dumping ground of Gundavali villagers to Purna Gram Panchayat

तालुक्यातील पूर्णा ग्रामपंचायतीच्या डम्पिंग ग्राऊंडमुळे दुर्गंधीने त्रस्त झालेल्या गुंदवलीच्या नागरिकांनी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी केली आहे. पूर्णा ग्रामपंचायतीचे डम्पिंग ग्राऊंड गुंदवली गावच्या वेशीवरच आहे. त्यामुळे गावातील अबालवृद्धांना येथून प्रवास करताना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याची दखल घेत येथील शिवसेनेचे युवा नेते सुमित म्हात्रे यांनी गुंदवली ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि समाजसेवक या शिष्टमंडळासोबत पूर्णा ग्रामपंचायत गाठली. यावेळी शिष्टमंडळाने पूर्णा ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा खंडागळे यांना डम्पिंग ग्राऊंड हटविण्याबाबत लेखी निवेदनातून मागणी केली.

शिष्टमंडळाची डम्पिंग ग्राऊंड हटवण्याची मागणी

तालुक्यातील पूर्णा ग्रामपंचायतीचा डम्पिंग ग्राऊंड गुंदवली गावाच्या वेशीवर आहे. त्यामुळे तेथून प्रवास करताना अबालवृद्धांना नाक मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसेच तेथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची दखल घेत येथील शिवसेनेचे युवा नेते सुमित म्हात्रे यांनी गुंदवली ग्रामपंचायतीचे सरपंच निता काळीराम म्हात्रे, उपसरपंच उत्तम म्हात्रे, सदस्य मनेष म्हात्रे, माजी सरपंच विजय म्हात्रे, सुरेश भोईर, समाजसेवक जयराज पाटील, काळीराम म्हात्रे, गजानन पाटील, किशोर पाटील, ग्रामविकास अधिकारी कैलास पाटील आदींच्या शिष्टमंडळाने पूर्णा ग्रामपंचायत कार्यालय गाठले. यावेळी शिष्टमंडळाने सरपंच हर्षदा प्रफुल्ल खंडागळे यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन देऊन डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी केली.

हेही वाचा – मीरा-भाईंदर महापालिकेत शिवसेना-भाजप नगरसेवकांचा राडा

नवीन डम्पिंग सुरु करण्यात येईल

गुंदवली ग्रामपंचायतीच्या नागरिकांना दुर्गंधीचा होणारा त्रास लक्षात घेऊन पूर्णा ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा खंडागळे यांनी तात्काळ येथील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. पूर्णा ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी डम्पिंग ग्राऊंड उपलब्ध व्हावे, यासाठी ग्रामपंचायतीने सरकारी गुरुचरण जागेत नवीन डम्पिंग ग्राऊंड सुरु करण्याचे प्रस्तावित केले आहे. नवीन डम्पिंग ग्राऊंड लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे गुंदवलीच्या नागरिकांना होणारा त्रास टळणार आहे, असा विश्वास पूर्णा ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा खंडागळे यांनी व्यक्त केला आहे.