घरमुंबईड्रीम्स मॉलमधील आग प्रकरणी सनराईज रुग्णालयावर ठोस कारवाईची मागणी

ड्रीम्स मॉलमधील आग प्रकरणी सनराईज रुग्णालयावर ठोस कारवाईची मागणी

Subscribe

पुढील बैठकीत आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी उपस्थित राहावे, असे निर्देश प्रशासनाला दिले.

भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये आग लागून सनराईज रुग्णालयातील ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेच्या तीव्र पडसाद आज पुन्हा एकदा स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. सर्वपक्षीय गटनेते, सदस्यांनी या घटनेप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित मॉल आणि सनराईज रुग्णालयावर ठोस कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पुढील बैठकीत या प्रकरणी कडक कारवाईबाबत ठोस निर्णय न घेतल्यास बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा सर्वपक्षीय गटनेते यांनी प्रशासनाला दिला.

यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, सदर घटनेप्रकरणी पालिकेच्या विधी खात्याची भूमिका संशयास्पद असून संबंधित कायदा अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. अग्निशमन दल, इमारत प्रस्ताव विभाग, विधी खाते यांनी पुढील बैठकीत आगीच्या घटनेबाबत चौकशी करून सविस्तर लेखी उत्तर द्यावे आणि पुढील बैठकीत मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी उपस्थित राहावे, असे निर्देश प्रशासनाला दिले.

- Advertisement -

दुर्घटनेला आयुक्त जबाबदार – रईस शेख

भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये आग लागून त्याची मोठी झळ बसून या मॉलमधील सनराईज या रुग्णालयातील ९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेला आयुक्त इकबाल सिंग चहल हेच जबाबदार असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केला. सदर मॉलमध्ये अग्नी सुरक्षा नीटपणे नाही. बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे, असा अहवाल संबंधित अधिकारी खानोलकर यांच्याकडून देण्यात आला होता. मात्र, आयुक्त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतरही सनराईज रुग्णालयाला वाढीव मुदत देण्यात आली. त्यामुळे या घटनेला आयुक्त हेच जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप रईस शेख यांनी यावेळी केला.

तसेच आता या मॉलला देण्यात आलेली ओसी रद्द करण्यात आली आहे. ही ओसी आगोदरच का रद्द केली नाही? असा सवालही शेख यांनी उपस्थित केला. तसेच, याप्रकरणी आयुक्तांवर बड्या लोकांचा, बिल्डरांचा दबाव असल्याचा आरोपही शेख यांनी यावेळी केला. सनराईज रुग्णालयावर ठोस कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

- Advertisement -

अन्यथा स्थायी समिती कामकाजावर बहिष्कार 

सनराईज रुग्णालय दुर्घटनेला १५ दिवस होत आले तरी याप्रकरणी संबंधित मॉल, रुग्णालयावर ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, ही बाब संतापजनक आहे. त्यामुळे जर याप्रकरणी ठोस कारवाई न केल्यास स्थायी समितीच्या आगामी बैठकीवर आम्ही बहिष्कार टाकू, असा इशारा पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रशासनाला दिला. तसेच, याप्रकरणी चौकशीसाठी स्थायी समितीची उपसमिती गठीत करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनीही या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत अग्निशमन दलाने दिलेल्या लेखी उत्तरावर असमाधान व्यक्त केले. दर ५- १० वर्षांनी मॉल, रुग्णालये यांचे इलेक्ट्रिकल आणि फायर ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी मी केली होती. मात्र, त्याबाबत दिशाभूल करणारे उत्तर अग्निशमन दलाने दिल्याचा आरोप विशाखा राऊत यांनी केला. निवृत्त न्यायाधीशामार्फत याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी राऊत यांनी केली. मात्र, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी रवी राजा व विशाखा राऊत यांची मागणी मान्य न करता पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी स्वतः या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -