घरमुंबईमुंबईत गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्ण संख्येत दरमहा वाढ

मुंबईत गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्ण संख्येत दरमहा वाढ

Subscribe

मुंबई  -: मुंबईत गतवर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत डेंग्यू रुग्णांची संख्या – ८७६ एवढी नोंदविण्यात आली होती. त्यामुळे दरमहा सरासरी ७३ रुग्ण आढळून आल्याने निदर्शनास येते. या तुलनेत यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत डेंग्यूच्या ८४४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे दरमहा सरासरी ८४ रुग्ण आढळून आल्याचे निदर्शनास येते. दोन वर्षातील डेंग्यू रुग्ण संख्येचा तुलनात्मक अभ्यास केल्यास गतवर्षीच्या तुलनेत यंदा दरमहा सरासरी रुग्ण संख्या ११ ने वाढल्याचे निदर्शनास येते.

अद्यापही संपूर्ण नोव्हेंबर व डिसेंबर महिना जायचा बाकी आहे. या दोन महिन्यांत डेंग्यू रुग्णांच्या संख्येत आणखीन काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्वच्छ पाण्यात वाढणाऱ्या डासांच्या आळ्या वेळीच नष्ट न केल्यास या आळ्या मोठ्या होऊन त्याचे रूपांतर मोठ्या डासांमध्ये होते. हे डास चावल्यास त्यापासून डेंग्यूची लागण होते. मुंबईत मलेरिया, लेप्टो, डेंग्यू, कावीळ चिकनगुनीया हे आजार पावसाळ्यात झपाट्याने पसरतात. मात्र सध्या मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी डेंग्यूचा धोका कायम आहे.

- Advertisement -

पालिकेच्या नायर रुग्णालयातील ओपीडीत रोज तापाचे रुग्ण तपासणीसाठी येत असतात. या रुग्णालयात दररोज किमान ५० ते ७० तापाचे रुग्ण दाखल होत आहेत. त्यांची रक्तासह इतर आवश्यक त्या सर्व तपासण्या करण्यात येतात. मात्र रक्त तपासणीचा अहवाल येण्यास किमान दोन दिवसांचा कालावधी लागत आहे. मात्र अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल करून उपचार केले जात आहेत.

या सर्व रुग्णांत सर्वाधिक रुग्ण हे डेंग्यूची लागण झालेले असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, अनेक रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्याचा अहवाल प्राप्त होत आहे. त्यामुळे रुग्णालयीन डॉक्टर सदर रुग्णांना ताप कमी करण्यासाठी आणि प्लेटलेट्स वाढवण्याबाबत औषधोपचार देत आहेत, यासंदर्भांतील माहिती नायर रुग्णालयातील संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. माला कनेरीया यांनी दिली आहे.


अनिल परब यांना साई रिसॉर्टप्रकरणी अंतरिम जामीन मंजूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -