घरमुंबईपालिकेची डॉक्टर इंटरपोलच्या मदतीला

पालिकेची डॉक्टर इंटरपोलच्या मदतीला

Subscribe

डॉ. संतोष पोळ प्रकरणात सापडलेल्या सांगाड्याच्या दातांच्या साहाय्याने बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यास पोलिसांना मदत करण्यामध्ये मुंबई महापालिकेच्या नायर दंत वैद्यकीय रुग्णालयातील डॉ. हेमलता पांडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती

अहमदनगरमधील कोपर्डी प्रकरण व सातार्‍यामधील डॉ. संतोष पोळ प्रकरणाने सार्‍या देशाला हादरवून सोडले होते. कोपर्डी प्रकरणात दातांनी चावलेल्या व्रणांवरून आरोपीचा शोध घेण्यास व डॉ. संतोष पोळ प्रकरणात सापडलेल्या सांगाड्याच्या दातांच्या साहाय्याने बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यास पोलिसांना मदत करण्यामध्ये मुंबई महापालिकेच्या नायर दंत वैद्यकीय रुग्णालयातील डॉ. हेमलता पांडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील तपास यंत्रणा असलेल्या इंटरपोलने घेतली आहे. भारतीय उपखंड व शेजारील देशांमध्ये काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. डॉ. हेमलता यांना मिळालेली ही संधी म्हणजे महापालिकेच्या शिरपेचात खोवलेला मानाचा तुराच आहे.

नायरमधील डॉ. हेमलता पांडे

एखाद्या खुनामध्ये मृतदेहावरील व्रणांवरून त्याची ओळख पटवणे, तसेच या व्रणांवरून मारेकर्‍याचा शोध घेण्याचे काम फॉरेन्सिक विभागातर्फे केले जाते. भारतामध्ये हाताचे ठसे व सांगाड्याच्या मदतीने ओळख पटवण्यावर भर दिला जातो. एखाद्या व्यक्तीच्या दातांवरून त्याची ओळख पटवण्याचे व आरोपी शोधण्याचे तंत्र प्रगत झाले असले तरी भारतामध्ये त्याचा फारसा वापर होत नाही. भारतामध्ये फॉरेन्सिक ओडोन्टोलॉजिमध्ये पारंगत असलेले डॉक्टर हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत. यामध्ये डॉ. हेमलता यांचा समावेश आहे. डॉ. हेमलता यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटलेल्या कोपर्डी प्रकरणात पीडित मुलीच्या अंगावरील दातांच्या व्रणावरून आरोपीचा शोध घेण्यास पोलिसांना मदत केली होती. दरम्यान चार महिलांसह सहा जणांची हत्या करणार्‍या डॉ. संतोष पोळ प्रकरणात कुजलेल्या अवस्थेतील सांगाड्याच्या दातांच्या माध्यमातून एका परिचारिकेची ओळख डॉ. हेमलता पांडे यांनी पटवली होती.

- Advertisement -

यांचे कार्य आंतरराष्ट्रीय पातळीवर

डॉ. पांडे यांनी आतापर्यंत ४५  प्रकरणांमध्ये गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांची मदत केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत इंटरनॅशनल फॉरेन्सिक ओडोन्टोलॉजी फॉर ह्यूमन राईट व केनीऑन ईएमर्जन्सी सर्विस या दोन आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांना आपले सदस्यत्व दिले. या दोन्ही संस्था इंटरपोलसाठी काम करतात. भारतीय उपखंड व आसपासच्या देशामध्ये तसेच आफ्रिका खंडामध्ये डॉ. हेमलता यांच्या कुशलतेचा उपयोग करून घेण्यात येणार आहे. डॉ. हेमलता पांडे यांनी अहमदनगरमधील लोणी येथून बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीचे (बीडीएस) शिक्षण पूर्ण केले. या वेळी त्यांना फॉरेन्सिक ओडोन्टोलॉजीची माहिती मिळाली. त्यांनी शिक्षकांकडे चौकशी केली असता भारतामध्ये यासंदर्भात कोणताही कोर्स नसून अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व युरोपमधील देशांमध्ये हा कोर्से शिकवला जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी बीडीएसचे शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी इंग्लंड गाठले. इंग्लंडमध्ये २०१२ मध्ये शिक्षण पूर्ण केले. तिथे त्यांना नोकरी मिळणे सहज शक्य होते. पण आपल्या शिक्षणाचा फायदा आपल्या देशाला व्हावा व फॉरेन्सिक ओडोन्टोलॉजीचे शिक्षण भारतातील अन्य विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी त्यांनी भारतामध्ये परतण्याचा निर्णय घेतला.

संधीचे सोने केले

भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी मुंबई, दिल्लीसह दक्षिणेकडील काही राज्यांमध्येही नोकरीसाठी प्रयत्न केले. पण असा विभाग कोठेच नसल्याने त्यांना नोकरी मिळत नव्हती. यातच २०१३ मध्ये त्यांना केईएम व नायर रुग्णालयात सहा महिन्याच्या कंत्राटी तत्त्वावर नोकरी मिळाली. त्यांनी नायर दंत वैद्यकीय महाविद्यालयातील मौखिक रोगनिदानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजीव देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली संधीचे सोने केले.

- Advertisement -

मुलुंडमध्ये २०१३ मध्ये एका कचरा उचलणार्‍या महिलेवर नऊ जणांनी शारीरिक अत्याचार केले. या महिलेच्या अंगावर चावा घेतल्याचे व्रण होते. या प्रकरणात चावा घेतलेल्या व्रणावरून हेमलता यांनी आरोपी शोधण्यात पोलिसांसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. या घटनेमुळे हेमलता यांची ओळख पोलिसांना झाली. यानंतर चार वर्षे जुने असलेल्या हरिद्वारमधील एका प्रकरणात त्यांनी पोलिसांची मदत केली. हेमलता यांनी आतापर्यंत ४५ प्रकरणामध्ये पोलिसांची मदत केली आहे.

काय आहे फॉरेन्सिक ओडोन्टोलॉजी

एखाद्या व्यक्तीची हत्या करून तिला गाडल्यानंतर त्या व्यक्तीच्या सर्व अवयवांचे विघटन होऊन ते नष्ट होतात. त्यामुळे त्याची ओळख पटणे अवघड होते. पण दात हा आपल्या शरीरातील सर्वात टणक घटक असल्याने त्याचे लवकर विघटन होत नाही. त्यामुळे दातांच्या मदतीने व्यक्तीची ओळख या शास्त्रातून पटवली जाते. तसेच दाताच्या व्रणावरूनही त्या व्यक्तीची ओळख पटवता येते. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचे वय माहीत नसेल तर दातांच्या मदतीने त्याचे अंदाजित वय कळू शकते.

फॉरेन्सिक ओडोन्टोलॉजी विभागासाठी प्रयत्न

फॉरेन्सिक ओडोन्टोलॉजी हा विभाग नायर दंत वैद्यकीय रुग्णालयात सुरु करण्याचा त्यांचा विचार आहे. नायरमध्ये अनेक प्रकरणे येत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सहज शक्य होईल. नायरमध्ये हा विभाग सुरु झाल्यास महाराष्ट्रातील पहिला फॉरेन्सिक ओडोन्टोलॉजी विभाग सुरु करण्याचा मान नायर रुग्णालयाला मिळेल.

देशात तीनच ठिकाणी आहेत विभाग

दिल्लीतील मौलाना आझाद इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स महाविद्यालयात हा विभाग सुरु झाला असला तरी सध्या तो कार्यरत नाही. कर्नाटकमधील एका खासगी महाविद्यालयात याचे आता शिक्षण मिळते. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे मुंबईत एक वर्षाचा कोर्स आहे. येथे डॉ, हेमलता स्वतः शिकवत असल्या तरी हा कोर्स ऑनलाईन असल्याने विद्यार्थ्यांना फारशी माहिती मिळत नाही.


विनायक डिगे । मुंबई

 

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -