कोरोना दुर्लक्षाची मोठी किंमत चुकवावी लागेल

उपमुख्यमंत्री पवारांचा निर्बंध लागू करण्याचा इशारा

ajit pawar

कोरोनाचे संकट अजून मानगुटीवर असतानाही कुणीही मास्क घालत नाही, हे अत्यंत घातक आहे. या दुर्लक्षाची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिला आहे. राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाची मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना याचे राजकारण केले जात असल्याबद्दलही त्यांनी खेद व्यक्त केला. कोरोनावर कोणीही राजकारण करू नये, असे सांगताना पवार यांनी रुग्णवाढ झाल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात येतील, असे स्पष्ट केले. हे संकट लक्षात घेऊन आपण उद्याच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे स्पष्ट केले.

कोरोनाच्या संकटाने हजारोंच्या संख्येने राज्यातल्या जनतेला प्राण गमवावे लागले आहेत. हे संकट इतके गंभीर असतानाही ग्रामस्थ आणि नागरिक मास्क वापरत नाहीत. कोरोनासंदर्भात कठोर निर्णय घेण्याची वेळ नागरिक आणत असल्याचे पवार म्हणाले. काही लोक कोरोनाबाबत नाहक राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे नाव न घेता पवार यांनी केला. शिवजयंती साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय वाढते संकट पाहून सरकारने घेतला; पण काहीजण यालाही आक्षेप घेत आहेत.

शिवरायांची जयंती हा प्रत्येक व्यक्तीच्या अभिमानाचा विषय आहे. वाढत्या कोरोनाने हा निर्णय घ्यावा लागला. या विषयावर राजकारण करून लोकांना कुणीही भावनिक करू नये, असे अजित पवार यांनी बजावले. कोरोना पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनाही नियमावली लावली पाहिजे, असा टोला त्यांनी भाजपला लावला. मी मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तातडीने निर्णय घेतला जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.

वीजबिल पर्याय देण्याचा विचार

एकट्या मराठवाड्यात वीजबील थकबाकीपोटी 15 हजार कोटी येणे आहे. ज्यांच्यावर थकित आहे, त्यांनी टप्प्याटप्प्याने थकबाकी भरली पाहिजे, असे पवार म्हणाले. शेतकरी अडचणीत आहे; पण सरकारने मदतीचा हातही दिला आहे. यामुळे वीजबिल भरले पाहिजे, असे ते म्हणाले. याचेही काहीजण राजकारण करत आहेत. पण तरीही यावर काही पर्यायी मार्ग काढता येतो काय बघू, त्याबाबत आम्ही निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. आर्थिक परिस्थिती लक्षात घेता भरीव निधी द्यायला आम्हाला मर्यादा पडल्या आहेत. कोरोनामुळे उत्पन्न आलेले नाही आणि केंद्राकडून 28 हजार कोटी रुपयांची येणी आहे. ती मिळावी, यासाठी विरोधकांनी प्रयत्न करण्याऐवजी केवळ सरकारला दोष देण्यात ही मंडळी धन्यता मानत असल्याची टीका पवार यांनी केली.