Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई कंटेनरमधील लोखंड चोरणारी टोळी गजाआड

कंटेनरमधील लोखंड चोरणारी टोळी गजाआड

Related Story

- Advertisement -

वाडा तालुक्यातील अंबिटघर येथून लोखंड घेऊन चाललेल्या कंटेनरला महामार्गावर खुपरी येथे अडवून चालकाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्यामधील जवळपास 16 टन लोखंडाची चोरी केल्याची खळबळजनक घटना सोमवारी 10 फेब्रुवारीला घडली होती. या गुन्ह्यातील प्रथमेश पाटील, अमर शिर्के, केदार सावंत, नीरज सावंत, प्रशांत पाटील, प्रशांत पाटील या 6 आरोपींना अटक करण्यात पालघर दहशतवादी विरोधी पथकाला यश आले आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले आरोपी उच्चभ्रू कुटुंबातील असल्याचे तपासात उजेडात आले आहे.

अंबिटघर येथे सूर्या स्टील या लोखंडाचे उत्पादन करणार्‍या कंपनीतून 10 फेब्रुवारीला 26 टन लोखंडी सळया घेऊन मुंबईकडे निघालेल्या कंटेनरला अडवून व रिव्हॉल्वरचा धाक दाखवून कंटेनरमधील 15 लाख 9 हजार 656 रुपयांच्या 16 टन लोखंडी सळया लंपास करून कंटेनर कंचाड भागात आणून सोडून दिले होते. या गुन्ह्यात वापरलेल्या काळ्या व्हेरना गाडीचे सीसीटीव्ही फुटेज मनोर येथून पोलिसांनी प्राप्त केले होते. तसेच कंटेनरबाबत काही फुटेज मिळाले होते.
दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना मंगळवारी रात्री आपल्या सहकार्‍यांसह मनोर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुन्ह्यातील आरोपी प्रथमेश अनिरुद्ध पाटील ( वय 22, रा. बोरांडे, पालसई, वाडा), केदार किरण सावंत ( वय 26, रा. आंबिस्ते, वाडा), निरज किरण सावंत (वय 26, रा. आंबिस्ते, वाडा), प्रशांत विजय पाटील ( वय 24,रा. भावेघर, खानिवली, वाडा) यांनी आपल्या साथीदारांसह माल चोरल्याची माहिती मिळाली. याआधारे आरोपींचा माग पथक घेत होते. याची कुणकुण लागताच चोरट्यांनी चारचाकी वाहनातून पळून जात होते. यावेळी थरारक पद्धतीने जीव धोक्यात घालून पथकाने चारही आरोपींना अटक केली होती.

- Advertisement -

यावेळी तपासात आरोपींनी आपल्या इतर दोन साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी अमर मोहन शिर्के ( वय 25,रा. मेठ शिर्केपाडा, वाडा) आणि प्रशांत उर्फ पाशा राजू पाटील ( वय 23, रा. शिरसाट गाव, वसई) येथून अटक केली. पोलिसांनी चोरलेल्या मालाची चौकशी केली असता आरोपींना चोरलेले लोखंड अंबिस्ते गावच्या हद्दीत जमिनीखाली पुरुन ठेवल्याची माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी चोरीला गेलेल्या 16 टन लोखंडी सळ्या हस्तगत केल्या.
सदर कारवाईत पालघर दहशतवादी विरोधी पथकाचे मानसिंग पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी महत्वाची भूमिका बजावली असून वाडा पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद बोराडे, उप निरीक्षक प्रमोद दोरकर, हरेश धनगर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर.बी.भडांगे, पो.कॉ. नागेश निल, सुशील बांगर, सतीश शेलवले यांचा संयुक्त सहभाग होता. दरम्यान या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी करीत आहेत.

- Advertisement -