Legislative Council Election : निवडणुकीच्या आचार संहितेमुळे विकास कामाचा प्रस्ताव रखडला, एकही प्रस्ताव मंजूर नाही

ही निवडणूक होण्यापूर्वी आचारसंहिता लागू...

vidhansabha

मुंबई : मुंबईत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विधान परिषदेसाठी २ आमदार निवडून देण्यासाठी १० डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक होण्यापूर्वी आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे बुधवारी स्थायी समितीची बैठक कोणतेही प्रस्ताव मंजूर न करता अवघ्या ५ मिनिटांत आटोपली. तर विधी समिती बैठकीत महत्वाचा एक प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवला आणि उर्वरित सर्व प्रस्ताव मंजूर न करता राखून ठेवण्यात आले.

यासंदर्भातील माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी माहिती दिली. येत्या १० डिसेंबरला होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंबईतून शिवसेनेतर्फे सुनील शिंदे, भाजपतर्फे राजहंस सिंह यांनी आणि काँग्रेसचे समर्थन असलेले सुरेश कोपरकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

या निवडणुकीचा निकाल १४ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत तरी आचारसंहिता लागू असणार आहे. परिणामी महापालिकेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समिती, विधी समिती अथवा अन्य विशेष आणि संविधानिक समित्या, प्रभाग समित्यांच्या बैठकीत निवडणुकीवर प्रभाव टाकणारा कोणताही निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे याचा परिणाम हा पालिकेच्या जनहितार्थ योजना, धोरण, उपक्रम, विकास कामे आदींवर होणार आहे.

बुधवारी पार पडलेल्या बैठकीत, दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी पालिकेकडून मोफत इलेक्ट्रिक सायकल वाटप, विधवा, गरीब महिलांना घरघंटी, वाती बनविण्याचे यंत्र, शिलाई मशीन यांचे वाटप करणे, मलेरिया, डेंग्यू, चिकूनगुण्या, हत्तीरोग इत्यादी आजारांच्या नियंत्रणासाठी आवश्यक अळीनाशक तेलाची खरेदी करणे, अग्निशमनदल कर्मचाऱ्यांची खासगी वैद्यकीय तपासणी करणे आदीबाबतचे प्रस्ताव मंजूर न करता राखून ठेवण्यात आले आहेत. यापुढे १४ डिसेंबरपर्यंत जेवढ्या समित्यांच्या बैठका होतील त्यात निवडणुकीवर प्रभाव टाकणारा कोणताही प्रस्ताव मंजूर करता येणार नाही.


हेही वाचा: बिटकाईनवर सरकारकडून बंदी, गुंतवणूकदारांमध्ये उडाली एकच खळबळ