घरCORONA UPDATEकाँग्रेस कोरोनाचं खापर मुख्यमंत्र्यांवर फोडतंय, राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपची भूमिका!

काँग्रेस कोरोनाचं खापर मुख्यमंत्र्यांवर फोडतंय, राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपची भूमिका!

Subscribe

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या एका वक्तव्यावरून सध्या राज्याच्या राजकारणात बरीच चर्चा सुरू झाली आहे. या वक्तव्यामुळे काँग्रेस राज्य सरकारच्या पाठिशी नाही की काय, अशी शंका देखील घेतली जाऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर आता विरोधकांच्या हाती आयतं कोलीत आलं असून त्यांनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधायला सुरूवात केली आहे. ‘राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य हे काँग्रेसकडून राज्यातल्या परिस्थितीची जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे. आता मुख्यमंत्र्यांचे साथीदार त्यांची साथ हळूहळू सोडत आहेत, हेच यावरून दिसून येतंय’, अशी खोचक टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

देशातल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीवर राहुल गांधींनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. ते म्हणाले, ‘महाराष्ट्र सरकारला आमचा फक्त पाठिंबा आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये आम्ही डिसीजन मेकर नाही’, असं विधान राहुल गांधींनी केलं आहे. याआधी देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी अशाच आशयाचं विधान केलं होतं. त्यामुळे आता राज्य सरकारमधल्या काँग्रेसच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.

- Advertisement -

फडणवीसांनी साधला थेट निशाणा

या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांनी संधी साधत काँग्रेसवर थेट निशाणा साधला आहे. ‘अशा प्रकारचं वक्तव्य राहुल गांधींनी दिलं, ते आश्चर्यकारक आहे. याचा अर्थ सरळ आहे की कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं दिसल्यानंतर या परिस्थितीचं संपूर्ण खापर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर फोडायचं आणि आपण नामानिराळं व्हायचं असं यातून दिसतंय. गोष्टी बिघडतायत हे खरंय, पण तुम्ही सरकारमध्ये आहात. त्यामुळे जबाबदारी झटकता येणार नाही. राहुल गांधींचं वक्तव्य जबाबदारी झटकणारं आहे. राज्यात कोरोनाचं संकट हाताबाहेर जात असताना सरकारमधले मुख्यमंत्र्यांचे साथीदार देखील त्यांची साथ हळूहळू सोडत आहेत हेच यावरून दिसतंय’, असं फडणवीस म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -