पर्यावरणमंत्री असले तरी आदित्य ठाकरेंनी अभ्यास केला होता का? आरेवरून फडणवीसांची टीका

devendra fadnavis

गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम सण निर्बंधमुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी मेट्रो कारशेडवरुन पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने उत्तर दिले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांच्या हितासाठी नाही, तर केवळ इगोपोटी मेट्रो कारशेड कांजुरला नेण्याचा निर्णय घेतला, असा आरोप त्यांनी केला. तर आदित्य ठाकरे जरुर पर्यावरण मंत्री राहिले असतील, पण सगळा अभ्यास त्यांनीच केला असा त्याचा अर्थ होत नाही, असा टोला फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना लगावला.

मेट्रोला उशीर करणे म्हणजे  मुंबईकराचे आयुष्य कमी करणे –

यावेळी यापूर्वी या संस्थांनी आरेमधील मेट्रो कारशेडच्या विरोधात आंदोलन केले होते. ते हायकोर्टात गेले होते. मात्र, न्यायालयाने या संस्थेच्या विरोधात निकाल दिला. पुढे ते राष्ट्रीय हरित लवादाकडे गेले, त्यांनीही संस्थेच्या विरोधात निकाल दिला. त्यानंतर ते सुप्रीम कोर्टात गेले होते, असे फडणवीस म्हणाले. पुढे त्यांनी दोन लाख मेट्रिक टन किंवा कमी-अधिक कार्बन उत्सर्जन आपण थांबवणार आहोत. मेट्रोला आपण एक एक दिवस उशीर करणे म्हणजे एक-एका मुंबईकराचे आयुष्य प्रदूषणाच्या माध्यमातून कमी करणे, असा अर्थ असल्याचे फडणवीस म्हणाले.

हा निर्णय केवळ इगोकरता घेतला –

ही जागा पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारने फायनल केली होती. आमच्या सरकारमध्ये जायकासोबत करार झाला. त्याचवेळी कारशेड कांजूरला नेण्याची मागणी झाली. समिती स्थापन केली. मात्र, हे शिफ्टिंग फिजीबल नसल्याचे त्यांनी सांगितले, तरीही आम्ही कोर्टात गेलो. कोर्टाने सांगितले ३००० कोटी भरा मग निकाल देऊ, मग आरेची जागा फायनल केली. पुढे उद्धव ठाकरेंचे सरकार आले, त्यांनी कमिटी नेमली, त्यांनीही सांगितले की आरे कारशेड कांजूरला नेले, तर ते ४ वर्ष बनणार नाही आणि वीस हजार कोटींचा अधिक खर्च होईल. आधीच हा २२ हजार कोटींचा प्रकल्प आहे. इतका स्पष्ट निर्णय सरकारी कमिटीने दिला असताना, उद्धव ठाकरेंनी मुंबईकरांच्या हितासाठी नाही, तर केवळ इगोकरता घेतलेला निर्णय आहे, असा आरोप फडणवीसांनी केला.

आदित्य ठाकरेंवर टीका –

आरे कारशेडमुळे मिठी नदीला पूर येत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला होता. यावरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला. आदित्य ठाकरे जरुर पर्यावरण मंत्री असतील, पण सगळा अभ्यास त्यांनीच केलाय असा याचा अर्थ होत नाही. हे कारशेड सगळे पर्यावरणाचे अभ्यास करुन झाले आहे. मिठी नदीच्या पुराची इतकीच चिंता होती, मग बीएमसीच्या कारभारात मिठीवर जितके अतिक्रमण झाले, त्याचे काय? हा पूर अतिक्रमणे आणि अवैध बांधकामांच्या परवानग्यांमुळे येतो आहे. त्यावर लक्ष दिले असते तर ही वेळ आली नसती, असे फडणवीस म्हणाले.