घरमुंबईफडणवीस यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

फडणवीस यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Subscribe

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. राज ठाकरे यांच्या पायावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली. त्यांची विचारपूस करण्यासाठी फडणवीस गेले होते, मात्र राज्यात नुकतेच झालेले सत्तांतर, लवकरच होणार्‍या महापालिका निवडणुका या पार्श्वभूमीवर या भेटीबद्दल राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

राज्यात सत्तांतर होण्यापूर्वी भाजप आणि मनसेने राजकीयदृष्ठ्या समान भूमिका घ्यायला सुरुवात केली होती. मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर विशेषतः मशिदींवरील भोंग्याच्या प्रश्नावरून भाजप आणि मनसेची जवळीक वाढली होती. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येणार, अशी चर्चा सुरू असताना राज्यात अनपेक्षितपणे सत्तांतर झाले. त्यानंतर मनसेने थेट शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला.

- Advertisement -

विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि शिंदे-फडणवीस सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावेळी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी सरकारच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्राद्वारे दोघांचे अभिनंदनही केले होते, मात्र शस्त्रक्रियेमुळे राज ठाकरे कोणाला भेटू शकत नव्हते. आता प्रकृती चांगली झाल्यानंतर त्यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी शुक्रवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी फडणवीस यांचे औक्षण करून स्वागत केले. राज ठाकरे यांच्यासोबत फडणवीस यांची चर्चा झाली. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे मनसेचे नेतेही यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

कोणाला मळमळायचे कारण नाही : फडणवीस
राज ठाकरे-फडणवीस यांच्या भेटीवर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ज्यांच्याकडे १ आमदार आहे अशा नेत्याच्या घरी १०६ आमदार असणारा नेता जातो याचे काय करणार तुम्ही, असा सवाल केला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांची भेट घेणे, चांगले संबंध ठेवणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आमच्या भेटीमुळे कोणाला मळमळायचे कारण नाही, असा टोला लगावला आहे.

मनसेला मंत्रिमंडळात स्थान?
दरम्यान, फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या वाढत्या जवळकीमुळे मनसेला राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. मनसेचे आमदार राजू पाटील अथवा नेते बाळा नांदगावकर यापैकी एकाला संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -