तर २७ गावाचं डिझास्टर होईल; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

कल्याण डोंबिवलीत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कल्याण डोंबिवलीचा दौरा केला.

devendra fadnavis in kalyan dombivli
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळलेल्या १७ नव्हे तर २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करणे गरजेचे होते. राज्य सरकारने २७ गावांचा एकत्रित विचार करायला हवा होता. नुसती नगरपालिका करून चालणार नाही त्यासाठी प्लॅन विकसित करून त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करायला हवा. या नगरपालिकेत सेवा सुविधा उपलब्ध न झाल्यास या गावांचा विकास न होता त्याचे डिझास्टर होईल, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण येथे बोलताना केली. तसेच कल्याण डोंबिवलीतील हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर तोकडे पडत असून राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले.

कल्याण डोंबिवलीत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्याच पार्श्वभूमीवर रविवारी त्यांनी कल्याणातील हॉली क्रॉस रुग्णालयाला भेट देऊन कोरोना संदर्भात डॉक्टारांशी चर्चा केली. त्यानंतर कल्याणच्या अत्रे रंगमंदिर कॉन्फरन्स हॉलमध्ये महापालिका आयुक्तांशी चर्चा केली. सरकारने २७ गावामधील १८ गावे वगळली आणि त्यांची स्वतंत्र नगरपरिषद केली. तर ९ गावे पालिकेतच ठेवली आहेत, याबाबत पत्रकारांनी त्यांना छेडले असता त्यांनी टीका केली. कोरोनाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, सध्याची स्थिती क्रिटीकल असून त्यासाठी आपली पूर्ण क्षमता राबवावी लागेल, जसे टेस्टिंग वाढेल तसे रुग्णांसाठी इन्फ्रास्ट्रक्चरही असणे आवश्यक आहे, असे ते पुढे म्हणाले.

एम.एम.आर रिजनमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी हा दौरा केल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. हॉली क्रॉस रुग्णालयाने चांगल्या प्रकारे काम केले असून “कोविड योद्ध्यांना माझा सलाम” अशा शब्दात त्यांनी हॉलीक्रॉसच्या कर्मचारी वर्गाची प्रशंसा केली. तसेच एम.एम.आर रिजनमध्ये रुग्णांच्या केसेस वाढत असल्यामुळे टेस्टिंग रेट वाढविणे गरजेचे आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, महापालिकेत पहिला रुग्ण दिनांक १३ मार्च २०२० रोजी सापडला नंतर लगेचच महापालिकेने दिनांक १६ मार्च २०२० ला इंडियन मेडीकल असोसिएशनसोबत बैठक घेतली आणि त्वरीत निऑन, बाज आर.आर रुग्णालय आणि हॉलीक्रॉस रुग्णालय यांच्यासमवेत सामंजस्य करार केला. आता महापालिकेने १७ खासगी रुग्णालयांसोबत सामंजस्य करार केला आहे. उद्या मनपाच्या सावळाराम क्रीडा संकूलातील बंदिस्त बॅडमिंटन कोर्ट येथील ३० बेडचे आय.सी.यू आणि १५५ बेडचे ऑक्सिजन सुविधा केंद्र सुरु होत असून डोंबिवलीतील जिमखाना येथे ७० बेडचे आय.सी.यू. आणि ३० बेडचे ऑक्सिजन सुविधा तसेच बीओटी तत्वावरील आर्ट गॅलरीमध्ये १२० बेडस आय.सी.यु आणि २५० बेडचे ऑक्सिजन सुविधा केंद्र १५ जुलै, २०२० कार्यान्वित होणार आहे.

आता सुमारे ८०० टेस्ट प्रतिदिन होत असून त्या २००० प्रतिदिन करण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी महापालिकेत वार्ड वॉईज क्वांरन्टाईन सेंटर उभारण्याची तयारी आम्ही करीत आहोत साधरणत: दिनांक १५ जुलैपर्यंत सुविधा तयार होतील. अशी माहिती पालिका आयुक्तांनी यावेळी दिली.

हॉलीक्रॉस रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून १९ एप्रिल २०२० ला सुरु केले, त्यामध्ये आतापर्यंत ३१३ रुग्ण दाखल केले असून केवळ १५ मृत्यू झाले आहेत. एक १९ दिवसांचे बाळ देखील या आजारातून बरे झालेले आहे, अशी माहिती आय. एम. ए चे सेक्रेटरी डॉ. प्रशांत पाटील यांनी यावेळी दिली.