देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे पत्रव्यवहार सुरूच!

maharashtra cm projects okayed devendra fadnavis over past six months under scanner cm uddhav

गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवर पत्र लिहून विविध प्रकारचे मुद्दे मांडत आहेत. नुकतंच त्यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून कोल्हापूर-सांगलीमध्ये येणाऱ्या संभाव्या पूरस्थितीला टाळण्यासाठी कर्नाटक सरकारसोबत मुख्यमंत्री पातळीवर चर्चा करण्याचं आवाहन केलं होतं. आता पुन्हा एकदा फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून मुंबई आणि महाराष्ट्रात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर काळजी व्यक्त केली आहे. तसेच, केईएम रुग्णालयात ऑक्सिजनच्या अल्प पातळीमुळे १० रुग्णांचा मृत्यू झाल्याकडे देखील लक्ष वेधलं आहे.

या पत्रामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. १९ जूनला राज्यात आत्तापर्यंतचे सर्वाधित ३८२७ रुग्ण तर सर्वाधित ११४ मृत्यू नोंदले गेले. राज्यातल्या एकूण रुग्णांपैकी ५२.१८ टक्के रुग्ण एकट्या मुंबईचे आहेत. जून महिन्याच्या १८ दिवसांमध्येच ४३.८६ टक्के रुग्ण वाढले आहेत. मुंबईत हेच प्रमाण ३६.८८ इतकं आहे. हे सगळं घडत असताना अजूनही मुंबईत कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची आकडेवारी लपवली जात आहे. त्यामुळे ती पारदर्शीपणे लोकांसमोर मांडली जायला हवी’.

याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रामध्ये मुंबईच्या केईएम रुग्णालयातल्या १० रुग्णांच्या मृत्यूच्या घटनेकडे देखील मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं. ‘केईएममध्ये ऑक्सिजन पातळी कमी झाल्यामुळे १० रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाचा कहर वाढत असताना मानवी चुकांमुळे बळींच्या संख्येत भर पडणं गंभीर आहे’, असं या पत्रात नमूद केलं आहे.