HomeमुंबईDharavi Accident : धारावीत अवाढव्य ट्रेलरची गाड्यांना धडक, वाहने गेली मिठी नदीपात्रात

Dharavi Accident : धारावीत अवाढव्य ट्रेलरची गाड्यांना धडक, वाहने गेली मिठी नदीपात्रात

Subscribe

मुंबईतही मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. मात्र, या अपघातामुळे सहा गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

मुंबई : राज्यातील विविध भागांमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच अपघात होत असल्याच्या घटना कानी पडत आहेत. अशातच आता मुंबईतही मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. मात्र, या अपघातामुळे सहा गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबईतील धारावी परिसरात असलेल्या टी जंक्शनजवळ शुक्रवारी पहाटे (ता. 03 जानेवारी) एका अवाढव्य ट्रेलरने काही गाड्यांना धडक दिल्याने तब्बल सहा वाहने मिठी नदीच्या पात्रात कोसळली. यामध्ये काळी-पिवळी टॅक्सी आणि टेम्पो या वाहनांचा समावेश आहे. ट्रेलर चालकाचा डोळा लागल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Dharavi Accident Huge trailer collided with cars vehicles went into Mithi river)

समोर आलेल्या माहितीनुसार, धारावीतील टी जंक्शनजवळ म्हणजेच माहिम उड्डाणपूल येथील रहेजा रुग्णालय परिसरात एका ट्रेलर चालकाला वाहन चालवत असताना अचानक डोळा लागला. यामुळे या वाहनाने सुरुवातीला काही वाहनांना धडक दिली. त्यानंतर हा ट्रेलर टी जंक्शन परिसरातील अन्य वाहनांना धडकला. महत्त्वाची बाब म्हणजे, या परिसरात वाहन चालक हे त्यांची वाहने मिठी नदीपात्राच्या शेजारी लावतात. ज्यामुळे ट्रेलरच्या धडकेत काही वाहने मिठी नदीपात्रात गेली. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने यावेळी वाहनांमध्ये कोणतीही व्यक्ती नसल्याने या घटनेत जीवितहानी झालेली नाही. परंतु, या घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा… Accident : रायगड जिल्ह्यात भीषण अपघात, टोईंग व्हॅनने अनेकांना चिरडले, वीर स्टेशनजवळील दुर्घटना

हा अपघात इतका भीषण होता की या ट्रेलरचा पुढचा काहीसा भाग मिठी नदीत गेला. या घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिका प्रशासन आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तर घटनेच्या काही तासांमध्येच अग्निशमन दलाने मिठी नदीत गेलेली वाहने नदीपात्राच्या बाहेर काढण्यास सुरुवात केली. तर, या प्रकरणी ट्रेलर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केल्याचेही पाहायला मिळाले. तर या अपघातावेळी हा ट्रेलर भरधाव वेगात होता, ज्यामुळे हा अपघातही भीषण स्वरुपाचा होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून देण्यात आली आहे.