घरमनोरंजन‘धर्मवीर’ची पहिल्याच दिवशी तब्बल २ कोटींची कमाई

‘धर्मवीर’ची पहिल्याच दिवशी तब्बल २ कोटींची कमाई

Subscribe

प्रवीण तरडे यांचे दिग्दर्शन असलेला आणि मंगेश देसाई यांची निर्मिती असलेला धर्मवीर – मु. पो. ठाणे चित्रपटाची महाराष्ट्रातील जनता आतुरतेने वाट पाहत होती. अखेर हा बहुचर्चित चित्रपट शुक्रवारी १३ मे रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला. हा सिनेमा दिवंगत शिवसेना नेते, माजी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असल्यामुळे सिनेमाला दमदार ओपनिंग मिळणार हे अपेक्षित होते. अपेक्षेप्रमाणेच धर्मवीर सिनेमाने पहिल्याच दिवशी तब्बल २ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

धर्मवीर चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच होती आणि प्रेक्षकांनी त्याला उत्तम प्रतिसादसुद्धा दिला. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे हुबेहूब साकारले आहेत. प्रसादने बोलण्याची शैली, देहबोली तसेच काही विशिष्ट पद्धतीने भूमिकेचा अभ्यास केला. दिघे यांचा ज्यांना सहवास लाभला त्यांच्याशी बोलून भूमिकेसाठी अधिक अभ्यास केला. दिघे साहेबांच्या भूमिकेसाठी लागणारे डोळे हे मला शूटिंग सुरू होण्यापूर्वी सापडले, असेही प्रसाद ओकने सांगितले. हे सारे पाहून आनंद दिघे साहेब परत आल्याची भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली. प्रवीण तरडे यांचे अभ्यासपूर्ण दिग्दर्शन आणि त्याच ताकदीने प्रसाद ओकचा अभिनय यामुळे धर्मवीर चित्रपट एक परिपूर्ण कलाकृती म्हणून या पुढेदेखील नक्कीच ओळखला जाईल.

- Advertisement -

१० हजारांहून अधिक स्क्रीनवर झळकला
अभिनेता प्रसाद ओकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक खास पोस्ट या चित्रपटाच्या निमित्ताने केली आहे. ‘व्यक्तिमत्त्वच बलाढ्य आहे, तर एण्ट्री साधी कशी असेल’ असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. धर्मवीर चित्रपटासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ४००पेक्षा अधिक चित्रपटगृहे आणि १० हजारांपेक्षा जास्त शोचा नवा विक्रम रचला आहे, असेही या पोस्टमध्ये प्रसाद ओकने म्हटले आहे.

शेवटचा सीन सोशल मीडियावर व्हायरल
धर्मवीर चित्रपटातील शेवटचा सीन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये राज ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यामधील संवाद दाखवण्यात आला आहे. आनंद दिघे राज ठाकरेंना म्हणतात की, हिंदुत्वाची धुरा आता तुझ्याच खांद्यावर आहे. दरम्यान, या सीनचा फोटो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. आनंद दिघे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये नेहमीच आपुलकीने आणि उत्तम पद्धतीने संवाद होत असे. त्यामुळेच चित्रपटातील हे दृश्य भावूक क्षणांची आठवण करून देणारे आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -