घरCORONA UPDATEघोटाळेबाज वाधवान कुटुंबीय प्रधान सचिवांच्या पत्राने महाबळेश्वरला, चौकशी सुरू!

घोटाळेबाज वाधवान कुटुंबीय प्रधान सचिवांच्या पत्राने महाबळेश्वरला, चौकशी सुरू!

Subscribe

एकीकडे राज्यातल्या सामान्य जनतेला सक्तीने घरातच बसवण्याचे आदेश आणि आवाहन केले जात असताना आता डीएचएफएल घोटाळ्यातले वाधवान बंधू यांच्यासह एकूण २३ जणांना घेऊन जाणाऱ्या ५ गाड्यांना थेट प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्याच पत्रावर खंडाळ्यातून महाबळेश्वरला जाण्याची परवानगी देण्यात आली. गंभीर बाब म्हणजे थेट गृहमंत्रालयाच्याच नावाने हे पत्र असल्यामुळे हे सर्व २३ जण बिनबोभाटपणे महाबळेश्वरला दाखल देखील झाले. अखेर महाबळेश्वरमधल्या स्थानिकांनी केलेल्या तक्रारीमुळे हा प्रकार उघड झाला असून त्यामध्ये या सर्व २३ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातले वाधवान बंधू डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटले आहेत. दरम्यान, गृहमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पण याबाबत ना गृहमंत्र्यांना माहिती होती ना गृहमंत्रालयातल्या कोणत्याही अधिकाऱ्यांना त्याची माहिती होती.

wadhwan brother letter from home ministry

जे झालं ते चुकीचं झालं. अशा प्रकारे २३ लोकांना परवानगी द्यायला नव्हती पाहिजे. हे पत्र प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनीच दिलं होतं. पण ते कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या इमर्जन्सीसाठी देण्यात आलं होतं त्याची चौकशी उद्या सकाळी ऑफिस उघडल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल आणि भूमिका स्पष्ट केली जाईल. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी देखील उद्या चर्चा केली जाईल.

अनिल देशमुख, गृहमंत्री

- Advertisement -

या पत्रामध्ये एकूण ५ गाड्यांचा समावेश आहे. त्यामध्ये एकूण २३ जणांनी प्रवास करत मुंबईहून महाबळेश्वर गाठलं. यामध्ये वाधवान कुटुंबीयांची देखील नावं आहेत. त्यात प्रत्येक गाडीनुसार त्यात प्रवास करणाऱ्यांची नावं नमूद केली आहेत.

जेएच ०५ बीपी ००२१ – कपिल वाधवान, अरुणा वाधवान, वनिता वाधवान आणि टीना वाधवान

- Advertisement -

जेएच ०५ बीपी ००१६ – धीरज वाधवान, कार्तिक वाधवान, पूजा वाधवान, युविका वाधवान आणि आहान वाधवान

एमएच ०२ डीडब्ल्यू ४१७९ – शत्रुघ्न घागा, मनोज यादव, विनिद शुक्ला, अशोक वाफेळकर आणि दिवान सिंह

एमएच ०२ डीझेड ७८०१ – अमोल मंडल, लोहित फर्नांडेस, जसप्रित सिंह अरी आणि जस्टिन डिमेल्लो

एमएच ०२ डीजी ५४७३ – इंद्रकांत चौधरी, प्रदीप कांबळे, एलिझाबेथ अय्यपिलई, रमेश शर्मा आणि तरकार सरकार

गंभीर प्रश्न उपस्थित, पण उत्तरं कधी मिळणार?

या प्रकारामधून अनेक बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे. एकीकडे राज्यातल्या सामान्य जनतेला घरातच राहणं बंधनकारक असताना बड्या धेंडांना सर्रास प्रवास करण्याची परवानगी कशी मिळाली? थेट गृहविभागाच्या नावाने हे पत्र जारी केलं असतानाही खुद्द गृहमंत्र्यांनाच याची माहिती कशी नव्हती? प्रधान सचिव अमिताभ गुप्ता हे वाधवान कुटुंबीयांना पत्रामध्ये ‘माझे कौटुंबिक मित्र’ का म्हणत आहेत? पाच गाड्यांपैकी दोन गाड्या जमशेदपूरच्या असतानाही रस्त्यामध्ये त्यांना कुठेही का अडवण्यात आलं नाही? बाहेरच्या राज्यांमधल्या गाड्या लॉकडाऊन काळात खंडाळ्यात आल्याच कशा? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

येस बँक घोटाळ्यातले आरोपी अशलेल्या वाधवान बंधूंविरोधात सीबीआयने अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे. पण त्यांना अटक करून सीबीआयच्या हवाली करण्याऐवजी महाराष्ट्र सरकारने त्यांना व्हीव्हीआयपी वागणूक देत थेट गृहमंत्रालयाच्या पत्रावर महाबळेश्वरला जायची परवानगी दिली. गृहमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यायलाच हवं. यासंदर्भात मी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतिंह कोश्यारी यांना चौकशीचे आदेश देण्याची विनंती केली आहे.

किरीट सोमय्या, भाजप नेते

वाधवान कुटुंबीय आणि त्यांच्यासोबतचे इतर अशा एकूण २३ जणांना महाबळेश्वर पोलिसांनी कलम १४४ संचारबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी ताब्यात घेतलं आहे. या सगळ्यांना महाबळेश्वरमधल्या त्यांच्या फार्महाऊसमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे १६ मार्चला अंमलबजावणी संचलनालयाने जेव्हा कपिल आणि धीरज वाधवान या दोघा येस बँक घोटाळाप्रकरणी आरोपी असलेल्या बंधूंना समन्स बजावले, तेव्हा कोरोनामुळे आम्हाला येता येत नाही, असं कारण देऊन त्यांनी ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहणं टाळलं होतं. ७ मार्चला येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर, कपिल वाधवान, धीरज वाधवान, आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स आणि दोईट अर्बन व्हेंचर्स लिमिटेड कंपनी (जिची मालकी राणा कपूर यांच्या मुलींकडे आहे) या सगळ्यांविरोधाच येस बँक घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -