घरमुंबईप्रदीप शर्मांनी जिलेटीन कांड्या आणल्या होत्या?

प्रदीप शर्मांनी जिलेटीन कांड्या आणल्या होत्या?

Subscribe

एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची सलग दुसर्‍या दिवशी देखील साडे आठ तास एनआयएकडून चौकशी करण्यात आली. सचिन वाझे याने प्रदीप शर्मा यांचे नाव घेतले असून जिलेटीन कांड्या या शर्मा यांनी मागवल्याचे वाझे यांनी जबाबात म्हटले असल्याचे एनआयएच्या सूत्रांनी सांगितले. मात्र एनआयएकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

अँटालियाजवळ स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी बुधवारी एनआयएने तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची चार तास तर एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची साडे आठ तास चौकशी करण्यात आली होती. गुरुवारी दुसर्‍या दिवशी पुन्हा प्रदीप शर्मा यांना एनआयए ने चौकशीसाठी बोलवून घेतले आहे. गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास प्रदीप शर्मा हे एनआयएच्या कार्यालयात दाखल झाले होते. साडेआठ तास चौकशी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

- Advertisement -

सचिन वाझे यांनी प्रदीप शर्मा यांचे नाव घेऊन जिलेटीन कांड्या शर्मा यांनीच आणून दिल्या होत्या, असे वृत्त असून १४ मोबाईल सिमकार्ड पैकी एक सिम प्रदीप शर्मा हे स्वतः वापरत असल्याचा संशय एनआयएला असल्याची चर्चा आहे. दरम्यान, ३ मार्च रोजी वाझे आणि विनायक शिंदे यांनी अंधेरी पूर्व येथे शर्मा यांची भेट घेतली होती, अशी देखील कबुली वाझे याने एनआयएला दिल्याचे समजते.

…परमबीर सिंह यांच्यासह चार जणांचे जबाब घेतले

तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या १०० कोटीच्या लेटर बॉम्बप्रकरणी सीबीआयकडून परमबीर सिंग, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्यासह चार जणांचे जबाब गुरुवारी नोंदवले गेले आहे. याप्रकरणात आणखी काही अधिकारी आणि खाजगी इसमाचे जबाब बाकी असून लवकरच त्याचे देखील जबाब घेण्यात येणार असल्याची माहिती सीबीआयचे प्रवक्ते यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

- Advertisement -

राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतून महिन्याला १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिले होते असा लेखी आरोपतत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. या भ्रष्टचाराची चौकशी व्हावी यासाठी अ‍ॅडव्होकेट जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश देऊन १५ दिवसात न्यायालयात अहवाल सादर करण्यात यावे अशी सूचना देण्यात आली होती.

यासदर्भात सीबीआयने बुधवारी एनआयए न्यायालयाकडून या संदर्भात सचिन वाझे याचा जबाब घेण्यासाठी परवानगी मागितली होती. एनआयए न्यायालयाने सीबीआय परवानगी दिल्यानंतर गुरुवारी सीबीआयच्या अधिकार्‍यांनी एनआयए कार्यालयात जाऊन सचिन वाझे यांच्याकडे यासंदर्भात चौकशी करून त्याचा जबाब नोंद करून घेतला आहे. तसेच वाझे याच्या लेटरबॉम्ब बाबत देखील त्याच्याकडे विचारणा करण्यात आली असल्याचे समजते. वाझे याच्या जबाबानंतर सीबीआयने तत्कालीन पोलीस आयक्त परमबीर सिंह, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि अ‍ॅडव्होकेट जयश्री पाटील यांचे देखील जबाब नोंद केले असल्याची माहिती सीबीआयचे प्रवक्ते यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -