घरमुंबईसमुद्र किनारा स्वच्छतेच्या कंत्राटदरात तफावत; पालिकेला आर्थिक फटका

समुद्र किनारा स्वच्छतेच्या कंत्राटदरात तफावत; पालिकेला आर्थिक फटका

Subscribe

मुंबईला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. मात्र या समुद्राच्या पाण्यात पडणारा व नंतर वाहत समुद्र किनाऱ्यावर धडकणारा कचरा, प्लॅस्टिक आदी प्रकारचा कचरा दररोज गोळा करून समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेने खासगी कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एच/पश्चिम विभागातील चिंबई व वारींगपाडा समुद्र किनारी स्वच्छता राखण्यासाठी नेमण्यात येणारा कंत्राटदार प्रतिदिन १३,८९९ रुपये प्रमाणे दोन वर्षांसाठी १.०५ कोटी रुपये वसुल करणार आहे. तर मढ- मार्वे समुद्र किनारी अशाच प्रकारची स्वच्छता करण्याच्या कामासाठी नेमण्यात येणारा कंत्राटदार प्रतिदिन ३९,६३६ रुपये पहिल्या वर्षी तर सहाव्या वर्षी थेट ४९,५४५ रुपये दर आकारणार आहे. त्यामुळे या कंत्राटदाराला पालिका तब्बल १०.१६ कोटी रुपये मोजणार आहे.

या दोन कंत्राट कामांची तुलना केल्यास पालिकेला मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे निदर्शनास येत आहे.
यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. या प्रस्तावावर विरोधक व भाजप यांच्याकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सात समुद्र बेटांनी निर्माण झालेल्या मुंबई शहराला तिन्ही बाजूनी मोठा समुद्र किनारा लाभला आहे. मुंबईत गिरगाव, दादर, वर्सोवा, जुहू, माहीम, मढ- मार्वे यासारख्या चौपाटया लाभल्या आहेत. या चौपाट्यांवर सार्वजनिक, साप्ताहिक सुट्टीच्या निमित्ताने व अन्य दिवशीही मुंबईकर, पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. गेल्या मार्च महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. अद्यापही कोरोना गेलेला नाही. लॉकडाऊनमुळे नागरिक चौपाट्यांवर फिरकत नव्हते. मात्र आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने मुंबईकर चौपाट्यांवर आता फिरू लागले आहेत.

- Advertisement -

मात्र आता मुंबईतील चौपाट्या या गर्दीने फुलत आहेत. मुंबईला लाभलेल्या समुद्रात, किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा,प्लॅस्टिक वाहून येते. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होते. यास्तव,समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेने खासगी कंत्राटदार नेमायला सुरुवात केली आहे. अगोदरचे कंत्राट काम संपले की दुसरा कंत्राटदार नेमावा लागतो. त्यानुसार, पालिकेने एच/पश्चिम ( खार – सांताक्रूझ) विभागातील चिंबई व वारींगपाडा समुद्र किनारी स्वच्छता राखण्यासाठी मे.राम इंजिनिअरिंग एन्ड कन्स्ट्रक्शन कंपनी या कंत्राटदाराला दोन वर्षांसाठी कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने मनुष्यबळ व डंपर वापरून स्वच्छता करायची आहे. त्यासाठी कंत्राटदाराला प्रतिदिन १३,८९९ रुपये प्रमाणे दोन वर्षांसाठी १.०५ कोटी रुपये मोजण्यात येणार आहेत.

तसेच, मढ- मार्वे समुद्र किनारी अशाच प्रकारची स्वच्छता करण्याच्या कामासाठी मे. रक्षित इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट प्रा. लि. या कंत्राटदाराला ६ वर्षांसाठी कंत्राट काम देण्यात येणार आहे. त्याने बिच क्लिनिंग मशीनचा वापर करून समुद्र किनारा स्वच्छ करायचा आहे. त्यासाठी कंत्राटदाराला पहिल्या वर्षासाठी प्रतिदिन ३९,६३६ रुपये, दुसऱ्या वर्षासाठी ४१,६१७ रुपये, तिसऱ्या वर्षासाठी ४३,५९९ रुपये, चौथ्या वर्षासाठी ४३,५८१ रुपये , पाचव्या वर्षासाठी ४७,५६३ रुपये तर सहाव्या वर्षी थेट ४९,५४५ रुपये दर आकारणार आहे. त्यामुळे या कंत्राटदाराला पालिका तब्बल १०.१६ कोटी रुपये मोजणार आहे. दोन्ही कामांची तुलना केल्यास आर्थिक दृष्ट्या खूप मोठी तफावत आढळून येत आहे. त्यामुळे या प्रस्तावावर स्थायी समितीच्या बैठकीत खरमरीत चर्चा होण्याची शक्यता वाटते.


हेही वाचा- IND vs ENG : ‘पुन्हा’ फिरकीला अनुकूल खेळपट्टी; सुंदरच्या जागी कुलदीपला संधी?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -