घरमुंबईप्रमाणपत्रावरून ‘डिप्लोमा’ वगळल्याने विद्यार्थी हवालदिल

प्रमाणपत्रावरून ‘डिप्लोमा’ वगळल्याने विद्यार्थी हवालदिल

Subscribe

वांद्रे येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमधून अ‍ॅडव्हॉन्स डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल सेफ्टी अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाने डिप्लोमा शब्द वगळून प्रमाणपत्र दिले आहे. यामुळे अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र देण्यास कॉलेज व्यवस्थापनाने विरोध केल्याने युवासेनेने आक्रमक भूमिका घेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेल्या अभ्यासक्रमाचेच प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडे (एमएसबीटीई) केली आहे. मात्र गर्व्हमेंट पॉलिटेक्निक कॉलेजला स्वायत्त दर्जा असल्यामुळे त्यांना अभ्यासक्रमाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे एमएसबीटीईकडून सांगण्यात आले.

गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये बॅच क्रमांक 9 च्या विद्यार्थ्यांनी अ‍ॅडव्हॉन्स डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल सेफ्टी या सहा महिन्याच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. प्रशासनाने अभ्यासक्रमाची जाहिरात आणि शुल्काच्या पावतीवरही या अभ्यासक्रमाचा उल्लेख केला. मात्र, अभ्यासक्रम पूर्ण होत आल्यानंतर प्रशासनाने विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रावर ‘डिप्लोमा’ शब्दाऐवजी मॅनेजमेंट हा शब्दाचा उल्लेख करण्यात येईल, असे सांगितले आहे. यामुळे नोकरीच्या संधी पाहून अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. प्रमाणपत्रावर डिप्लोमा ऐवजी मॅनेजमेंट हा शब्द लिहिल्यास विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यात अडचण येणार असल्याने विद्यार्थ्यांनी युवा सेनेच्या सिनेट सदस्यांकडे धाव घेतली.

- Advertisement -

सिनेट सदस्य वैभव थोरात, शीतल देवरूखकर-शेट आणि युवा सेना कार्यकारीणी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या संचालकांना याबाबत निवेदन दिले आहे. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची फसवणूक होत आहे. विद्यार्थ्यांना ज्या अभ्यासक्रमाच्या नावाने प्रवेश देण्यात आला, त्याच अभ्यासक्रमाच्या नावाने पदवी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी सदस्यांनी केली आहे. महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा मिळाल्याने त्यांच्याकडून मनमानी कारभार सुरू असल्याने तंत्र शिक्षण मंडळाने संबंधीत महाविद्यालयावर कारवाई करावी, अशी मागणीही थोरात यांनी केली आहे.

गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजला स्वायत्त दर्जा असल्याने त्यांच्या अभ्यासक्रमाबाबत निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. परंतु प्रमाणपत्राबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत कॉलेजच्या प्राचार्यांना योग्य कारवाई करण्याबाबत सांगण्यात आले आहे.
– डॉ. विनोद मोहितकर, संचालक, एमएसबीटी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -