कल्याण-डोंबिवलीत आशा वर्कर्सची निराशा; तुटपुंज्या मानधनात करतायत काम

Disappointment of asha workers in Kalyan-Dombivali
कल्याण-डोंबिवलीत आशा वर्कर्सची निराशा; तुटपुंज्या मानधनात करतायत काम

कल्याण डोबिंवली क्षेत्रात कोरोना लढ्यासाठी कार्यरत असणाऱ्या १०७ आशा वर्कर तुटपुंज्या मानधनावर १० तासांहून अधिक वेळ काम करीत असून विमा कवचाची शाश्वती नसताना देखील काम करून पदरी निराशा पडत असल्याची व्यथा केडीएमसी क्षेत्रातील आशा वर्कर्सनी मांडली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील १४ नागरी आरोग्य केंद्रच्या माध्यमातून १०७ आशा वर्कर प्रभागातील गरोदर माता नोंदणी, क्षयरोग तपासणी, नोंदणी, तापाचे रुग्ण तपासणी, नोंदणी तसेच कुटुंब नियोजन, बालकांचे लसीकरण, जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी आदींची सर्व्हे कामे करीत दरमहा सुमारे ३००० हून अधिक मानधन प्राप्त करीत होत्या. कोरोना पार्श्वभूमीवर या आशा वर्करांना घरोघरी जाऊन सर्दी, खोकला, ताप रुग्णांचा सर्व्हे तसेच कोरोना रुग्णांना क्वारंटाईन करणे. कोरोना सुरुवातीला टाटा आमंत्रा येथे क्वारंटाईन रुग्णासाठी रात्र पाळीत कामे करून कोरोना संकटाच्या काळात राबवित जीव धोक्यात घालत विमा कवची शाश्वती नसताना देखील १५०० रुपये मासिक मानधनावर तर प्रत्यदिनी अवघ्या ५० रुपये काम करावे लागत असल्याचे चित्र दिसत असल्याने आशा वर्कर्सच्या पदरी घोर निराशा पडत आहे.

कोरोना संकट काळात या कोविड योद्धाच्या पदरी जीव धोक्यात घालून काम करावे लागत असल्याने ग्रामीण भागातील आशा वर्कर्सना राज्यशासनाने २५ लाखांच्या विमा कवच दिले असून क.डो.म.पा.क्षेत्रातील आशा वर्कर्सना देखील विमा कवच लागू करावे. तसेच उल्हासनगर पालिका धर्तीवर किमान १० हजार रुपये एवढे मानधन द्यावे अशी मागणी आशा वर्कर प्रतिनिधी गीता माने, चंद्रावती आर्य, संगीता प्रजावती, सरिता गायकवाड, संगीता आयरे यांनी पालिका आयुक्त, महापौर आणि विरोधीपक्ष नेत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्य आरोग्य आधिकारी डॉ. कदम यांच्याशी यासंदर्भात वारंवार फोन करून देखील त्यांनी फोन घेण्याचे सौजन्य देखील दाखविले नाही. तर आरोग्य विभाग उप आयुक्त मिलिंद धाट यांच्याशी संपर्क साधला असता वाढीव मानधन मागणी बाबत प्रस्ताव आल्यास तो प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला जाईल. विमा कवच प्रस्तावाबाबत माहिती घेऊन सांगतो असे सांगितले.