कोट्यवधीच्या फसवणूक प्रकरणी दिशा मार्केटिंगच्या संतोष नाईकला अटक

संतोष नाईक

राज्यातील विविध ठिकाणी प्लॉट विक्रीच्या नावाखाली अनेकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणार्‍या ठाण्यातील दिशा डायरेक्टर मार्केटिंग कंपनीचा कार्यकारी अधिकारी संतोष नाईक याला फसवणुकीच्या गुन्ह्यात ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली. न्यायालयाने त्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संतोष नाईक आणि त्याच्या कंपनीने राज्यभरातील 25 जणांची सुमारे 3 कोटी 15 लाखांची फसवणूक केली आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोड, हिरानंदानी इस्टेट येथील रहिवाशी धर्मराज राव (61) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिशा डायरेक्टरचा संचालक संतोष नाईक आणि त्याची पत्नी सुजाता तसेच अन्य एक संचालक चेतन चव्हाण यांनी ठाण्यातील तीन हात नाका येथील इटर्निटी मॉलमध्ये 2010 ते 2016 या काळात कार्यालय सुरू केले होते. याच कार्यालयातून वेगवेगळे प्रोजेक्ट सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्याद्वारे राज्यातील शहापूर तसेच सातारा, कर्जत आणि कसारा या ठिकाणी या प्रोजेक्टमधील जमिनीचे प्लॉट देतो, असे सांगून तक्रारदारांना वेगवेगळे प्रोजेक्ट दाखविले. पैसे गुंतविल्यावर दोन वर्षांच्या कालावधीनंतर जर गुंतवणूकदारास प्लॉट नको असल्यास त्यांनी गुंतविलेल्या रकमेच्या अर्धी रक्कम देऊन करार रद्द केला जाईल, अथवा प्लॉट पाहिजे असल्यास दोन वर्षांनंतर रितसर प्लॉटच्या सातबारा उतार्‍यावर नाव नोंदवून प्लॉट गुंतवणूकदारांच्या नावावर केला जाईल, असे आमिष दाखविले.

दिशा डायरेक्टरच्या संचालकांनी वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये गुंतवणूक करण्यास सांगून ठरल्याप्रमाणे प्लॉट आणि भरलेली रक्कम परत न देता धर्मराज आणि त्यांच्या पत्नीची 15 लाख 23 हजार रुपयांची आणि इतर 24 गुंतवणूकदारांची तीन कोटी 31 हजार रुपयांची अशी एकूण तीन कोटी 15 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सुरुवातीला 17 गुंतवणूकदारांनी 13 ऑगस्ट 2020 रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला. यात आणखी गुंतवणूकदारांनीही तक्रार केल्याने हे प्रकरण ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले. पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या पथकाने संतोष नाईक याला अटक केली.