आश्रय योजनेचा प्रस्ताव मागे घेण्यावरून सेना, भाजपात तू तू मैं मै

सफाई कामगार वसाहत पुनर्विकास प्रस्ताव मागे घेण्यास भाजपचा विरोध

Dispute between shiv Sena and BJP over withdrawal of asylum proposal
आश्रय योजनेचा प्रस्ताव मागे घेण्यावरून सेना, भाजपात तू तू मैं मै

मुंबई महापालिका प्रशासनाने, दादर, कासारवाडी आणि प्रभादेवी येथील सफाई कामगार वसाहतींचा आश्रय योजनेच्या अंतर्गत पुनर्विकास करण्याबाबतचा ४७८ कोटी रुपये खर्चाचा अपेक्षेप्रमाणे बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासकीय कारण देत मागे घेतला. पालिकेने प्रस्ताव मागे घेण्याबाबतची कारणे स्पष्ट केलेली नसल्याने व एका मराठी कंत्राटदाराला कंत्राटकाम देण्यास शिवसेनाच विरोध करीत असल्याचा आरोप करीत भाजपने प्रस्ताव मागे घेण्यास विरोध दर्शविला.
मात्र स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, पालिका प्रशासनाने तांत्रिक व प्रशासकीय कारणे देत प्रस्ताव मागे घेतला आहे. असे असताना भाजप उगाचच या प्रस्तावाला विरोध करून राजकारण करीत असल्याचा आरोप केला.

तसेच,भाजपच्या विरोधाला न जुमानता सदर प्रस्ताव शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी बहुमताच्या जोरावर मंजूर केला. त्यामुळे आता हा प्रस्ताव प्रशासन जेव्हा पुन्हा मंजुरीला सादर करेल त्याचवेळी त्यावर पुन्हा एकदा निर्णय प्रक्रिया होईल. अन्यथा हा प्रस्ताव लटकल्यात जमा होणार आहे.

तेव्हा भाजपला मराठी कंत्राटदाराचा प्रस्ताव कळला नव्हता का?

वास्तविक, स्थायी समितीने हा प्रस्ताव गेल्या जुलै महिन्यात फेटाळला होता. त्यानंतर प्रशासनाने, पुन्हा एकदा हा प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी सादर केला आहे. मात्र आता काही तांत्रिक व प्रशासकीय कारणास्तव हा प्रस्ताव प्रशासनाने मागे घेतला आहे. मग यापूर्वी जेव्हा तो प्रस्ताव परत पाठवण्यात आला होता त्याचवेळी भाजपला हा मराठी कंत्राटदाराचा प्रस्ताव आहे, हे कळले नव्हते का ? तेव्हा भाजपला मराठी माणूस आठवला नाही का ? की मराठी समजत नव्हते का ? असे सवाल उपस्थित करीत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपवर तोफ डागली.


हेही वाचा – प्रकल्पबाधितांना पर्यायी घरांऐवजी ५० लाखांपर्यंतच मोबदला