घरमुंबईकापडी पिशव्यांचे वाटप आचारसंहितेत अडकले; निवडणुकीनंतर होणार वाटप

कापडी पिशव्यांचे वाटप आचारसंहितेत अडकले; निवडणुकीनंतर होणार वाटप

Subscribe

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आता कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

प्लास्टिक  पिशव्यांवर बंदी घालण्यात आल्याने कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आल्याने मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांच्या निधीतून कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या सांताक्रुझ पूर्व येथील प्रभाग क्रमांक ८७ मध्ये कापडी पिशव्यांच्या वाटपासाठी महापालिका प्रशासनाने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. परंतु, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आडवी आल्याने हे वाटप होऊ शकले नाही. आता आचारसंहिता उठल्यानंतरच पिशव्यांचे वाटप केले जाणार आहे. तब्बल १३ लाख रुपयांच्या या पिशव्या आहेत.

कापडी पिशव्यांचा वापर वाढला

मुंबईसह राज्यात प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आल्याने कापडी पिशव्यांचा वापर वाढला आहे. चांगल्या प्रतीच्या कापडी पिशवीचा बाजारातील दर किमान २० ते ३० रुपये इतका आहे. त्यामुळे कापडी पिशव्यांचा वापर वाढावा यासाठी नगरसेवक निधीतून या पिशव्यांची खरेदी करण्यास पालिकेने मान्यता दिली आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या प्रभाग क्रमांक ८७ मध्ये पिशव्यांच्या खरेदीसाठी ४ सप्टेंबर २०१९ रोजी तातडीने निविदा मागवल्या होत्या त्यास फक्त दोन कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. निविदा प्रक्रिया पूर्ण करून सर्वात कमी दर असलेल्या कंत्राटदाराला ते काम मंजुर झाले.

आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर पिशव्यांचे वाटप होणार

निवडणुकीच्या तोंडावर पिशव्यांचे वाटप केले जाण्याची नियोजन करून २० सप्टेंबर २०१९ रोजी कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आले होते. मात्र, दोनच दिवसात म्हणजे २२ सप्टेंबरपासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने सगळेच मुसळ केरात गेले. त्यामुळे हे पिशवी वाटप आता आचारसंहिता उठल्यानंतर २७ ऑक्टोबरनंतर करावे लागणार आहे. ४ इंच, १४ इंच आणि १६ इंच बॉक्स आकाराच्या या कापडी पिशव्या असणार आहेत.  त्यामुळे आता निकालानंतर आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर पिशव्यांचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -