घरमुंबईमुंबईत कुठे आहे प्लास्टिक बंदी?

मुंबईत कुठे आहे प्लास्टिक बंदी?

Subscribe

आजवर ७० हजार किलोचे प्लास्टिक जप्त करूनही दुकानांमध्ये प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू आहे.

मुंबई, महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू करून १४ महिने उलटले आहेत. मात्र तरीही आजवर महाराष्ट्रासह मुंबई प्लास्टिकमुक्त झालेली नाही. मात्र, राज्यात प्लास्टिक बंदीचा फज्जा उडालेला असतानाच शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण देशात प्लास्टिक बंदी करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाचे समर्थन केले आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू करूनही सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांना याची कडक अंमलबजावणी करता आलेली नाही. मुंबईत आजवर सुमारे १२ लाख दुकानांची तपासणी करून ७० हजार प्लास्टिकचा साठा जप्त करूनही मुंबई प्लास्टिकमुक्त न झाल्याने आदित्य ठाकरे यांचे विधान चर्चेचा विषय ठरला आहे.

थर्माकोलच्या बंदीबाबत जनजागृती नाही

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मुंबईसह राज्यात २३ जून २०१८पासून प्लास्टिक बंदी लागू केली. परंतु मुंबई वगळता राज्यातील अन्य शहरांमध्ये याचा परिणाम दिसून आला नाही. मागील गणेशोत्सवात सजावटीसाठी थर्माकोलच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आणि त्यानंतर ते शिथिलही केले. परंतु यावर्षी गणेशोत्सवात थर्माकोल बंदीबाबत कोणत्याही स्वरुपात जनजागृती केली जात नाही. त्यामुळे आजही अनेक ठिकाणी थर्माकोलचे दर्शन घडत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ५८ हजार कोटी फिक्समध्ये तरीही दरवर्षी मुंबई पावसात बुडते ! 

आजही दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर

मुंबईत प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी कडकपणे केल्यानंतर दुकाने, मंडईतील गाळेधारक तसेच मॉल्समधील गाळ्यांची तपासणी करून प्लास्टिकचा साठा जप्त करत कडक कारवाई करण्यात आली. परंतु त्यासाठी आकारण्यात येणारा पाच हजारांच्या दंडामुळे महापालिकेच्या तिजोरीत भर पडली असली तरी सध्या मात्र ही कारवाई अत्यंत संथ गतीने सुरु आहे. दुकानांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्यास बंदी असली तरी दादर रेल्वे स्थानक परिसरासह अनेक भागांमधील फेरीवाल्यांद्वारे प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास केला जात आहे. त्यामुळे आजही या फेरीवाल्यांमुळे घरांघरांमध्ये पातळ पिशव्या जात असून या पातळ पिशव्यांमध्येच भाज्यांसह अन्य वस्तू विकल्या जात आहेत.

पालिकेच्या दंडात्मक कारवाईतून ३ कोटी वसूल

मुंबईत प्लास्टिक बंदी झाल्यापासून आतापर्यंत १२ लाख ०७ हजार ७५९ दुकानांसह गाळ्यांना भेटी देण्यात आल्या. या तपासणीमध्ये ७० हजार ९०५ किलोचा प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यापैकी ५७३ दुकानदारांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर या कारवाईतून ३ कोटी ९१ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आकडेवारीवरून स्प्ष्ट होते.

हेही वाचा – उरणमध्ये ओएनजीसी प्लांटमध्ये बिघाड; मुंबईत सीएनजीचा अभाव

आतापर्यंत केलेल्या तपासणीची आकडेवारी

  • एकूण भेटी – १२ लाख ०७ हजार ७५९
  • जमा करण्यात आलेला प्लास्टिकचा साठा – ७० हजार ९०५ किलो
  • पोलिस ठाण्यातील तक्रारी – ५७३
  • वसूल केलेला दंड – ३ कोटी ९१ लाख ३० हजार रुपये
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -