घरमुंबईदेशातील आरोग्यसेवा आता एका छताखाली

देशातील आरोग्यसेवा आता एका छताखाली

Subscribe

रुग्णांची समस्या लक्षात घेऊन डॉक्टरनेच बनवले ‘डॉकस्मार्ट’ हेल्थ अ‍ॅप

एखाद्या खासगी रुग्णालयामध्ये सरकारी योजना आहे का, आरोग्य विम्याची सुविधा आहे का, आरोग्य सुविधा कोणत्या आहेत, कोणत्या प्रकारचे उपचार होतात, रुग्णालयातील सुविधांचा दर्जा कसा आहे, जवळपास अ‍ॅम्ब्युलन्स कोणती मिळेल, फार्मसीचे कोणते दुकान जवळ आहे, अशी माहिती अनेकदा रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना नसते. त्यामुळे रुग्णाच्या अत्यवस्थ परिस्थितीमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होऊन त्यांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी येतात. तसेच उपचारासाठीचा खर्चही आवाक्याबाहेर जातो. त्यामुळे रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांची अडचण लक्षात घेऊन असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटचे माजी अध्यक्ष डॉ. दीपक बैद यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे रुग्णांना सर्व आरोग्य सुविधा एका छताखाली मिळाव्यात या उद्देशाने ‘डॉकस्मार्ट’ हेल्थ अ‍ॅप सुरू केले आहे. (DocSmart Health App for treatment to citizens)

एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हायचे असेल तर त्याला नेमके कोणत्या रुग्णालयात जायचे आहे हे कळत नाही. त्यामुळे रुग्णाला दाखल करीत असलेल्या नर्सिंग होम किंवा रुग्णालयामध्ये २४ तास ठेवून त्यानंतर अन्य रुग्णालयात हलवण्यास सांगितले जाते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड बसतो. त्याचप्रमाणे अनेक व्यक्ती इंटरनेटवर आपल्या जवळचे रुग्णालय शोधण्याचा प्रयत्न करीत असतात, पण त्यामध्ये त्यांना योग्य माहिती मिळत नाही. रुग्णांच्या नातेवाईकांच्या या समस्या लक्षात घेऊन डॉक्टरांची संघटना असलेल्या असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटचे माजी अध्यक्ष डॉ. दीपक बैद यांनी रुग्ण व डॉक्टर, रुग्ण व फार्मसी, रुग्ण व रुग्णालय यांचा थेट व पारदर्शक संबंध निर्माण व्हावा यासाठी ‘डॉकस्मार्ट’ हेल्थ अ‍ॅप सुरू केले आहे.

- Advertisement -

या अ‍ॅपवर देशातील सर्व खासगी रुग्णालये, नर्सिंग होमची माहिती दिली आहे. यामध्ये केंद्र सरकारने सुरू केलेल्या आयुष्मान भारत आणि राज्य सरकारच्या राजीव गांधी आरोग्य योजनेची सुविधा कोणत्या रुग्णालयामध्ये आहे हे माहीत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होते. ऐनवेळी कॅशलेस सुविधेसाठी एजंटला फोन करावा लागतो, पण आता नागरिकांची ही धावपळ संपणार आहे. तसेच या अ‍ॅपवर डॉक्टर, फार्मसी, अ‍ॅम्ब्युलन्सची सुविधाही उपलब्ध करून दिली असल्याची माहिती डॉ. दीपक बैद यांनी दिली.

डॉक्टरांची अपॉईंटमेट घेण्याची सुविधा
खासगी रुग्णालयामध्ये डॉक्टरांची अपॉईंटमेंट घेऊन जावे लागते. अशा वेळी रुग्णांच्या नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेऊन ‘डॉकस्मार्ट’ हेल्थ अ‍ॅपवर डॉक्टरांची अपॉईंटमेंट घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर, संबंधित आजाराबाबत डॉक्टरांची उपलब्धता याची माहिती रुग्णांना या अ‍ॅपवरून मिळणार आहे. त्यामुळे रुग्णांना होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.

- Advertisement -

मेडिकल टुरिझमचीही सुविधा
सध्या मेडिकल टुरिझमला प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे परदेशातून भारतामध्ये उपचारासाठी येणार्‍या रुग्णांनाही हे अ‍ॅप उपयोगी ठरणार आहे. परदेशी नागरिकांना रुग्णालये, त्यातील उपचाराची माहिती मिळवणे या अ‍ॅपमुळे सहज सोपे होणार आहे.

आरोग्यसेवेत पारदर्शकता
आतापर्यंत विविध कंपन्यांनी बनवलेली अ‍ॅप्स फक्त डॉक्टरांपुरतीच मर्यादित आहेत. यामध्ये डॉक्टरांनी रुग्णांवर केलेल्या उपचाराचे प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांकडेच असते, मात्र या अ‍ॅपवर रुग्णांचे स्वतंत्र डॅशबोर्ड असणार आहे. यामध्ये डॉक्टरांकडून करण्यात आलेल्या सर्व उपचाराची माहिती उपलब्ध असणार आहे. तसेच रुग्णांना जवळच्या फार्मसीमध्ये किती टक्के औषधांवर सूट मिळेल, रिफंड पॉलिसी अशा विविध सुविधाही आहेत.

ऑनलाईन सल्ल्यासाठी स्मार्ट क्लिनिक
ग्रामीण आणि शहर भागातील आरोग्य सुविधेमध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शहरी भागातील डॉक्टरांकडून थेट गावातून सुविधा मिळावी यासाठी डॉक्टरांसोबत थेट ऑनलाईन संवाद साधण्याची सुविधा या अ‍ॅपवर उपलब्ध करून दिली आहे.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -