घरमुंबईजेनेरिक औषधांचा डॉक्टर आणि मेडिकल स्टोअर्सना नॉशिया !

जेनेरिक औषधांचा डॉक्टर आणि मेडिकल स्टोअर्सना नॉशिया !

Subscribe

डॉक्टरांच्या अनास्थेमुळेच जेनेरिक औषधांची मागणी रुग्णांकडून होत नसल्याचा आरोप जेनेरिक मेडिकल स्टोअरच्या मालकांकडून होत आहे. तर जेनेरिक मेडिकल स्टोअरची संख्या कमी असल्याने व रुग्णांना जेनेरिक औषधे मिळण्यात अडचणी येत असल्याने आम्ही जेनेरिक औषधे लिहून देत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

रुग्णांना स्वस्त औषधे मिळावीत आणि गरिबीतील गरीब व्यक्तीला उपचार मिळावेत यासाठी डॉक्टरांनी जेनेरिक औषधांनाच प्राधान्य द्यावे, असे सरकारचे धोरण आहे. त्यासाठी प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये स्वतंत्र जागा ठेवावी, असे आदेश भारतीय औषध महानियंत्रकांनी दिले असले तरी अद्याप अनेक डॉक्टर व मेडिकल स्टोअर मालकांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. अनेक डॉक्टर अद्यापही नामांकित कंपन्यांची औषधे लिहून देत असल्याचे दिसून येते.

एकमेकांवर टोलवाटोलवी, रुग्ण लाभापासून वंचित

डॉक्टरांच्या अनास्थेमुळेच जेनेरिक औषधांची मागणी रुग्णांकडून होत नसल्याचा आरोप जेनेरिक मेडिकल स्टोअरच्या मालकांकडून होत आहे. सध्या मुंबईत जेनेरिक औषधांना फार्मा कंपन्यांच्या तुलनेत ३० टक्के इतकीच मागणी आहे. तरी डॉक्टरांनी पुढाकार घेतल्यास जास्तीत जास्त रुग्णांना जेनेरिक औषधांचा लाभ होईल, असे जेनेरिक मेडिकल स्टोअर मालकांना वाटते. मात्र जेनेरिक मेडिकल स्टोअरची संख्या कमी असल्याने व रुग्णांना जेनेरिक औषधे मिळण्यात अडचणी येत असल्याने आम्ही जेनेरिक औषधे लिहून देत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आमच्याकडे येणार्‍या रुग्णांना आम्ही जेनेरिक औषधे घेण्याबाबत सांगतो. परंतु डॉक्टरांनीच दिलेली औषधे द्या, असा रुग्णांचा अट्टाहास असतो. त्यामुळे आम्हाला रुग्णांना दर्जेदार कंपन्यांची औषधे द्यावी लागतात. काही रुग्णांना समजावून सांगितल्यानंतर समजते. तेव्हा ते जेनेरिक औषधे घेतात.

- Advertisement -

डॉक्टरांनीच रुग्णांना  जेनेरिक औषधे घेण्याचा सल्ला द्यावा

जर डॉक्टरांनीच रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना जेनेरिक औषधे घेण्याबाबत सल्ला दिल्यास तसेच त्याबद्दल त्याचे थोडे समुपदेशन केल्यास रुग्ण स्वतःहून जेनेरिक औषधे घेतील, असे विक्रोळीतील जनसेवा जेनेरिक मेडिकल स्टोअरचे अक्षय मुळ्ये यांनी सांगितले. ज्या रुग्णांना जेनेरिक औषधांबाबत माहिती आहे ते रुग्ण स्वतःहून जेनेरिक औषधांची मागणी करतात. परंतु जर डॉक्टरांनीच रुग्णांना माहिती दिल्यास रुग्णांचा जेनेरिक औषधे घेण्याकडे कल वाढेल, असेही त्यांनी सांगितले.

काही डॉक्टर जेनेरिक औषधे लिहून देत असले तरी अद्याप अनेक डॉक्टर जेनेरिक औषधे लिहून देत नाहीत. त्यामुळे लोक जेनेरिक औषधे घेत नाहीत, असे लालबागमधील श्री स्वामी जेनेरिक मेडिकल स्टोअरचे मालक सिद्धेश तर्फे यांनी सांगितले.

- Advertisement -

अनेकदा रुग्ण महागडी टॉनिक व अन्य औषधे लिहून मागतात. त्यामुळे आम्हाला ब्रँडेड औषधे लिहून देणे भाग पडते. तसेच जर एखाद्या औषधाचा परिणाम झाला नाही तर रुग्ण डॉक्टरला येऊन जाब विचारतो. तो मेडिकल स्टोअरवाल्यांना जाब विचारत नाही. त्यामुळे जेनेरिक औषधांची विश्वासार्हता कितपत आहे हेही तपासणे आवश्यक आहे, असे मत एका डॉक्टरने नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केले. जेनेरिक औषधे शोधण्यासाठी रुग्ण व त्याच्या नातेवाइकांना वणवण हिंडावे लागते. त्यामुळे सरकारने जेनेरिक औषधे सहज उपलब्ध होतील अशी व्यवस्था करावी, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष वाय. एस. देशपांडे यांनी सांगितले.

रुग्णाने सांगितल्यानंतरही जर डॉक्टर जेनेरिक औषधे लिहून देण्यास नकार देत असतील, तर याची तक्रार रुग्णाने करावी. तसे केल्यास त्या डॉक्टरची तपासणी करुन योग्य ती कारवाई केली जाईल.
– शिवकुमार उत्तरे, अध्यक्ष, महाराष्ट्र मेडिकल परिषद.

जेनेरिक औषध मेडिकल स्टोअरमध्ये असेल आणि जर कोणी ते रुग्णांना देत नसेल तर त्यावर आम्ही कारवाई करू शकतो. प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये जेनेरिक औषधांसाठी स्वतंत्र जागा असावी, असा आदेश केंद्राने दिला असला तरी त्याबाबत आमच्याकडे अजून कोणतेही परिपत्रक आलेले नाही.
– अमृत निखाडे, सहआयुक्त अन्न व औषध विभाग (ड्रग).

जेनेरिक औषधे मिळण्याची मुख्य ठिकाणे

  • जैन मेडिकल आणि जनरल स्टोअर, १२४/२६, हसनली हाऊस, बोरा बाजार, शॉप क्रमांक १, २, बोरा बाजार, मुंबई.
  • न्यू रॉयल केमिस्ट, ४१/४२, लिबर्टी सिनेमा, बॉम्बे हॉस्पिटलजवळ, न्यू मरीन लाईन्स, मुंबई.
  • जनसेवा मेडिकल
    शॉप क्रमांक २, सिद्धिविनायक शाळेच्या बाजूला हरियाला व्हिलेज, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व)
  • श्री स्वामी जेनेरिक मेडिकल स्टोअर, दुकान क्रमांक २, श्रॉफ बिल्डिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबाग
  • श्री स्वामी समर्थ आणि मेडिकल स्टोअर, ५ बी, सरस्वती महल क्रमांक ५, रानडे रोड जंक्शन, दादर.
  • जनरिको जेनेरिक मेडिकल शॉप, स्वरगंधा को. ऑप. हौ. सोसायटी, शॉप क्रमांक १६ , श्री नगर ठाणे (पश्चिम)
  • यश फार्मा, शॉप क्रमांक ९, आरोग्यम रुग्णालय, स्टार कॉलनी, मानपाडा रोड, डोंबिवली (पूर्व)

रुग्णांनी करावी मागणी

रुग्णांनी डॉक्टरांकडे जेनेरिक औषधे लिहून देण्याची मागणी करावी. तसेच डॉक्टरांनी औषधे लिहून न दिल्यास मेडिकल स्टोअरवाल्यांकडे रुग्णांनी जेनेरिक औषधाची मागणी करावी. या वेळी रुग्णांनी फार्मा कंपन्यांच्या औषधांमध्ये असलेले घटक जेनेरिक औषधांमध्ये आहेत का याची फार्मासिस्टकडून तपासणी करून घ्यावी.


विनायक डिगे, मुंबई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -