घरमुंबईमुंबईत प्रथमच कुत्र्यांसाठी रक्तदान शिबीर

मुंबईत प्रथमच कुत्र्यांसाठी रक्तदान शिबीर

Subscribe

रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान समजले जाते. मग ते माणूस असो की प्राणी. मुंबईमध्ये दरवर्षी अनेक कुत्र्यांचा अपघाताने किंवा अन्य आजारांनी मृत्यू होतो. यातील अनेक कुत्र्यांना वेळेवर रक्त न मिळाल्याने त्यांचा मृत्यू होतो.

रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान समजले जाते. मग ते माणूस असो की प्राणी. मुंबईमध्ये दरवर्षी अनेक कुत्र्यांचा अपघाताने किंवा अन्य आजारांनी मृत्यू होतो. यातील अनेक कुत्र्यांना वेळेवर रक्त न मिळाल्याने त्यांचा मृत्यू होतो. ही बाब लक्षात घेऊन परळ येथील दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट फॉर अ‍ॅनिमलतर्फे (बैलघोडा हॉस्पिटल) 28 सप्टेंबरला ‘वर्ल्ड रेबीज डे’निमित्त कुत्र्यांसाठी रक्तदान शिबीर भरवण्यात येणार आहेत. मुंबईत अशाप्रकारे कुत्र्यांसाठी प्रथमच रक्तदान शिबीर भरवण्यात येणार आहे.

परळ येथील बैलघोडा हॉस्पिटलमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कुत्रे उपचारासाठी येत असतात. यातील 200 ते 250 कुत्र्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येते. यामध्ये मूत्रपिंड निकामी होणे, कावीळ, डायलिसिस व अपघातात जखमी झालेल्या कुत्र्यांचा समावेश असतो. प्रत्येक महिन्याला दाखल कुत्र्यांपैकी साधारण 25 ते 30 कुत्र्यांना रक्ताची आवश्यकता भासत असते. हॉस्पिटलमधील कुत्र्यांमार्फत प्रत्येक महिन्याला 10 ते 12 तर रक्तदानातून 3 ते 4 रक्ताच्या बॅगा उपलब्ध होतात. त्यामुळे प्रत्येक महिन्याला साधारणपणे 10 कुत्र्यांना रक्ताची गरज लागते. कुत्र्यांना लागणार्‍या रक्तासाठी हॉस्पिटलकडून कुत्र्याच्या मालकांना अनेकदा विनंती केली जाते. परंतु, त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे कुत्र्यांच्या मालकांमध्ये रक्तदानाबाबत जागृती करण्यासाठी व कुत्र्यांना लागणार्‍या रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी हे शिबीर 28 सप्टेंबरला अंधेरी येथे हॉस्पिटलतर्फे भरवण्यात येणार असल्याची माहिती बैलघोडा हॉस्पिटलमधील प्राध्यापक डॉ. राजीव गायकवाड यांनी दिली.

- Advertisement -

कुत्र्यांच्या मालकांमध्ये कुत्र्याचे रक्तदान करण्याबाबत अनास्था असल्याने बर्‍याचदा वेळेवर रक्त मिळत नाही. रक्ताची ही गरज भागवण्यासाठी बैलघोडा हॉस्पिटलने ‘मेटेंनन्स ऑफ ऑनरलेस डॉग’ विभाग सुरू केला आहे. या विभागात कुत्र्याच्या मालकांनी सोडलेले 40 ते 45 कुत्रे आहेत. माणसांप्रमाणे कुत्र्यांमध्ये डी, ओ, जी असे तीन रक्तगट असतात. या कुत्र्यांच्या रक्ताचे वर्गीकरण करून गरज व नियमानुसार रक्त काढण्यात येते. कुत्र्यांचे रक्त हे सहा महिन्यांपर्यंत टिकवून ठेवता येते, अशी माहिती बैलघोडा हॉस्पिटलचे सचिव डॉ. जे. सी. खन्ना यांनी दिली.

हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी कुत्रे घेऊन येणार्‍या मालकांना आम्ही बर्‍याचदा रक्तदान करण्यास सांगतो. पण ते रक्तदान करण्यास नकार देतात. त्यामुळे कुत्र्यांच्या मालकांमध्ये रक्तदानाबाबत जागृती करण्यासाठी ‘वर्ल्ड रेबिज डे’निमित्त रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे.
– डॉ. जे. सी. खन्ना, सचिव, दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट फॉर अ‍ॅनिमल हॉस्पिटल

माझ्या कुत्र्याला काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यावेळी त्याला रक्ताची गरज लागली होती. परंतु, मी अनेकांना विनंती करूनही कोणी रक्त देण्यास तयार झाले नाही. तसेच जे रक्त देण्यास तयार झाले त्यांच्या कुत्र्यांचा रक्तगट जुळत नव्हता. त्यामुळे मला मोठ्या समस्येचा सामना करावा लागला होता. सात- आठ कुत्र्यांची चाचणी केल्यानंतर अखेर आम्हाला मिळताजुळता रक्तगट मिळाल्याने आमच्या कुत्र्याचे प्राण वाचले.
– निशिकांत सदाफुले, अंधेरी

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -