घरमुंबईसरपंच हत्येच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान श्वान पथकासह शेकडो पोलीस आदिस्ते गावात

सरपंच हत्येच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान श्वान पथकासह शेकडो पोलीस आदिस्ते गावात

Subscribe

तालुक्यातील आदिस्ते ग्रामपंचायतीच्या सरपंच मीनाक्षी मनोहर खिडबिडे यांच्या हत्येप्रकरणी कोणतेच धागेदोरे अद्याप पोलिसांच्या हाती आले नसल्याने या प्रकरणाचा तपास हे पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे. सर्व शक्यता आजमावून पोलीस मारेकर्‍यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. याविषयी तातडीने निवेदन करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे विधान परिषदेत केली.

सरपंच, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्या असलेल्या खिडबिडे सोमवारी, २७ डिसेंबर रोजी चुलीसाठी लागणारी सरपणाची लाकडे गोळा करण्यासाठी सकाळी ९ वाजता घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र, दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह विवस्त्रावस्थेत उबटवाडी-आदिस्ते दरम्यान रस्त्यापासून १०० मीटर अंतरावर आढळल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती स्थानिक पोलीस पाटलाकडून मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

- Advertisement -

खिडबिडे यांचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आला. मात्र, मंगळवारी हा मृतदेह न्यायवैद्यक तपासणीकरिता मुंबईत नेण्यात आला. सायंकाळी उशिरा गावात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. खिडबिडे यांची हत्या नेमक्या कोणत्या कारणावरून झाली, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू असून, हत्येपूर्वी त्यांच्यावर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, तपासात अद्याप कोणतीच ठोस माहिती समोर येत नसल्याने या हत्येमागील गूढही वाढले आहे.

तपासाकरिता अलिबाग येथून श्वान पथक तातडीने दाखल झाले. परंतु यातून काहीच निष्पन्न झाले नाही. या ठिकाणी पडलेल्या लाकडांवरील बोटांचे ठसे घेण्यात आले आहेत. घटना घडल्यानंतर पालकमंत्री आदिती तटकरे, स्थानिक आमदार भरत गोगावले, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उप विभागीय पोलीस अधिकारी नीलेश तांबे यांनी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नसून आदिस्ते गावाला सध्या पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -