‘मी स्वत:हून माझे जीवन संपवतोय’; पतपेढीच्या मॅनेजरची आत्महत्या

डोंबिवलीत एका पतपेढी मॅनेजरने कार्यालयातच गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

dombivali patpedhi manager yogesh aarote committed suicide in office
पतपेढीच्या मॅनेजरची आत्महत्या

डोंबिवलीत एका पतपेढी मॅनेजरने कार्यालयातच गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. योगेश आरोटे (४४) असे मॅनेजरचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे उघड झाले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

नेमके काय घडले?

डोंबिवलीजवळील ठाकुर्ली परिसरात सहकारमित्र मधूबन पतपेढी आहे. या पतपेढीमध्ये योगेश आरोटे हे मॅनेजरचे काम करत होते. त्यामुळे या पतपेढीची चावी त्यांच्याकडेच होती. नेहमीप्रमाणे ते आजही चावी घेऊन पतपेढीत आले. पतपेढीचे गेट उघडून ते आत बसले. काही वेळाने पतपेढीतील एक कर्मचारी त्या ठिकाणी आला. त्यावेळी योगेश आरोटे यांनी कार्यालयाच्या एका रुममध्ये गळफास घेतल्याचे समोर आले. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याने रामनगर पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच; रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी योगेश यांचा मृतदेह खाली उतरवून तपासणी केली असता त्यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली.

काय होते चिठ्ठीत?

योगेश यांनी चिठ्ठीत लिहिले होते की, ‘मी स्वत: हून माझे जीवन संपवत आहे. यात कोणी दोषी नाही. माझा अंत्यविधी इथेच करणे,’ असे त्या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते.

योगेश यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. सुसाईड नोट मिळाल्यानंतर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.


हेही वाचा – विवेक रहाडे आत्महत्या प्रकरण; मराठा आरक्षणासंदर्भातील सुसाईड नोट बनावट