ढोल-ताशांचा गजरात निघाली ग्रंथदिंडी

जागतिक मराठी भाषा दिन

जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त बुधवारी डोंबिवलीत मनसेच्या वतीनं ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत शेकडो शाळकरी मुलांसह डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने डोंबिवलीत मनसेनं ग्रंथदिंडी काढली. ज्ञानोबा माऊलींची मूर्ती आणि मराठी ग्रंथ पालखीत ठेवून त्याची शहरभर मिरवणूक काढण्यात आली. या दिंडीत ढोलताशा पथक, लेझीम पथक, वारकरी सहभागी झाले होते. सोबतच शाळकरी मुलांचाही मोठा सहभाग होता. तर डोंबिवलीकरांनीही नेहमीप्रमाणे पारंपरिक वेशभूषेत या ग्रंथदिंडीत सहभागी होत आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवले. डोंबिवलीच्या फडके रोडपासून गावदेवी मंदिरापर्यंत ही दिंडी काढण्यात आली, यानंतर पुस्तकांची दहीहंडी फोडून ही पुस्तकं लहान मुलांना वाटण्यात आली. लहान मुलांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी, आणि त्यांना मराठी भाषेचं महत्त्व कळावे, या उद्देशाने ही दिंडी काढण्यात आल्याचे मनसे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी सांगितलं.