घरमुंबईडोंगरी दुर्घटना श्रद्धांजली सभेत अनधिकृत बांधकामांवरून आरोप-प्रत्यारोप

डोंगरी दुर्घटना श्रद्धांजली सभेत अनधिकृत बांधकामांवरून आरोप-प्रत्यारोप

Subscribe

डोंगरी इमारत दुर्घटनेवरून महानगर पालिकेमध्ये रणकंदन!

डोंगरीतील इमारत दुर्घटनेत मृत पावलेल्यांना शुक्रवारी महापालिका सभागृहात श्रद्धांजली वाहताना ‘बी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांना वाचा फोडली. दोन-तीन मजल्याच्या चाळींवर सात-आठ मजले चढविण्यात येत अधिकारी त्याकडे लक्ष का देत नाहीत? असा सवाल नगरसेवकांनी केला. तसेच येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणात काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांनाच शिवसेनेने आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करत याला स्थानिक आमदारच जबाबदार असल्याचा आरोप केला. याला विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्यासह काँग्रेसच्या नगरसेवकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे या गोंधळातच डोंगरीतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई केली असती तर…

राष्ट्वादी काँग्रेसच्या राखी जाधव यांनी बी विभागात छोट्या छोट्या गल्ल्या असल्यामुळे तिथे मदत कार्य राबवताना प्रचंड त्रास झाला. त्यामुळे प्रत्येक विभागाचा स्वतंत्र आपत्कालीन आराखडा तयार करण्यात यावा, अशी सूचना केली. काँग्रेसच्या आफरीन शेख यांनी कोसळलेल्या इमारतीतील रहिवाशांना म्हाडाने कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नसल्याचे सांगितले. अनिधकृत बांधकामाला संरक्षण दिल्यास नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द होते, तर मग यातील दोषी अधिकार्‍यांवर प्रशासन सौम्य कारवाई का करतात? असा सवाल शिवसेनेचे नगरसेवक रमेश कोरगावकर यांनी केले. मागील वर्षी जेव्हा म्हाडाच्या अधिकार्‍यांकडून महापालिकेला तक्रार प्राप्त झाल्यानंतर महापालिकेच्या अधिकार्‍यांनी कारवाई केली असती, तर ही वेळ आली नसती, असे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले. महापालिकेच्या सिस्टीमलाच कीड लागल्याचा आरोप करत धोकादायक इमारतींबाबत सरकार आणि महापालिकेने संयुक्तपणे धोरण बनवावे, अशी मागणी त्यांनी केली. इमारत दुर्घटनेमुळे बेघर झालेली कुटुंबे कुठे राहणार? असा सवाल करत काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी मौनव्रत धारण करून महापालिकेला आपत्या कर्तव्यापासून दूर पळता येणार नाही, असे सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – डोंगरीत बांधकामाचा भ्रष्टाचार; दुरुस्तीच्या नावाखाली चढवले मजले!

अनधिकृत मजल्यांकडे दुर्लक्षच

दुर्घटनाग्रस्त केसरबाई इमारतीच्या जवळच्या दोन इमारतींमध्ये अनधिकृतपणे मजले चढविण्यात येत आहेत. प्रशासनाचे त्याकडे लक्ष नाही. या विभागामधील अनेक इमारतींवर अनधिकृतपणे मजले चढविण्यात आले आहेत. गेल्या १० वर्षांपासून ही अनधिकृत बांधकामे होत आहेत. गेली १० वर्षे मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेले काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांचे त्याकडे लक्ष गेलेले दिसत नाही. त्यांनी या अनधिकृत बांधकामांची तक्रार का केली नाही? असा सवाल करत तेही या प्रकरणास जबाबदार असल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला. अनधिकृत बांधकाम प्रकरणी केवळ सहाय्यक आयुक्तांनाच नव्हे तर उपायुक्त आणि अन्य अधिकार्‍यांनाही निलंबित करावे, अशीही मागणी त्यांनी केली. जाधव यांनी आरोप करताच विरोधी पक्षनेने रवी राजा यांच्यासह काँग्रेसच्या नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला. अमिन पटेल यांच्याबद्दल केलेले वक्तव्य मागे घेण्याची मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली. मात्र जाधव आपल्या वक्तव्यावर ठाम होते. अखेर या गोंधळातच ही चर्चा आटोपती घेण्यात आली. त्यानंतर केसरबाई इमारत दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांना श्रद्धांजली वाहून सभागृहाचे कामकाज आटोपण्यात आले.

महापौरांसह स्थायी समिती अध्यक्षांनी राजीनामा द्यावा – अमीन पटेल

मुंबई महापालिकेत मागील २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. या महापालिकेला मुंबईसह बी विभागातील अनधिकृत बांधकामे रोखता आलेली नाही. त्यामुळे डोंगरीतील इमारत दुर्घटनेला सत्ताधारी पक्षाचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायलाच हवा. पण त्याबरोबरच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनीही राजीनामा द्यायला हवा. ही अनधिकृत बांधकामे रोखण्यात असफल ठरल्याने आयुक्तांनी विवेक राही यांना निलंबित केले आहे. त्यामुळे राही यांच्याबरोबरच महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षही जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -