कोसळलेली इमारत म्हाडाची नव्हतीच! ट्रस्टदेखील तोंड फिरवणार?

डोंगरीमध्ये कोसळलेल्या इमारतीची जबाबदारी कुणी घ्यायची? यावर आता वाद सुरू झाला आहे.

Dongri Building Collapse

डोंगरीच्या बाब गल्लीत कोसळलेल्या इमारतीची जबाबदारी नक्की कुणाची? यावर आता चर्चा सुरू झाली आहे. ही इमारच म्हाडाचीच होती आणि तिच्या देखभालीमध्ये म्हाडानं चालढकल केल्याची तक्रार सुरुवातीला करण्यात आली. पण ही इमारत म्हाडाची नसल्याचं आता समोर आलं आहे. म्हाडानं त्यासंदर्भातलं एक पत्रकच जारी केलं आहे. त्यामध्ये ही इमारत म्हाडाची नसून सरकारच्या अखत्यारीतही तिची नोंद नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ही इमारत अवैध असल्याचं या पत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय होजा या ट्रस्टच्या अखत्यारीतली ही इमारत असल्याचंही सांगण्यात आलं. मात्र, या ट्रस्टने देखील या इमारतीतील रहिवाशांना या वर्षीच्या मार्च महिन्यातच नोटीस पाठवली होती. ती नोटीस व्हायरल झाली असून त्यामुळे आता नक्की या पडक्या इमारतीची आणि उध्वस्त झालेल्या संसारांची जबाबदारी घेणार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

म्हाडानं केले हात वर

जी इमारत कोसळली तिला लागूनच उभी असलेली २५/सी ही इमारत म्हाडाच्या अखत्यारीत येत असून ती इमारत तशीच उभी आहे. अर्थात, या इमारतीला देखील म्हाडाने २०१८ साली व्हेकेशन नोटीस पाठवून ती धोकादायक इमारत रिकामी करूवून घेतली आहे. मात्र, मंगळवारी ही इमारत तशीच राहून तिला लागून उभी असलेली अवैध इमारत कोसळली आहे. त्यामुळे कोसळलेली इमारत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या कार्यक्षेत्रात मोडत नाही, अशी भूमिका म्हाडाने घेतली आहे. त्यामुळे ही इमारत म्हाडाच्या अखत्यारीत येत नसल्याचं स्पष्ट होत आहे.


हेही वाचा – दुर्घटनास्थळी नेत्यांची लटांबरं हवीत कशाला?

ट्रस्ट देखील हात झटकणार?

मात्र, दुसरीकडे ज्या ट्रस्टच्या अखत्यारीत ही इमारत येते असं बोललं गेलं, त्या ट्रस्टनंही जुनी नोटीस दाखवून हात झटकले आहेत. या ट्रस्टनं संबंधित इमारतीतील रहिवाशांना पुनर्विकासासंदर्भात २० मार्च २०१९रोजी पाठवलेल्या नोटिशीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या नोटिशीनुसार, ‘इमारतीतील रहिवाशांना पुनर्विकासासाठी विकासकासोबतच्या करारपत्राव स्वाक्षरी करून पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू करायची होती. ते न केल्यास होणाऱ्या दुर्घटनेसाठी ट्रस्ट जबाबदार नसेल’, अशी अट घालण्यात आली आहे. मात्र, या इमारतीचा पुनर्विकासच न झाल्यामुळे ट्रस देखील हात झटकण्याची शक्यता आहे. त्यामुळे नक्की या इमारतीचा वाली कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.