घरनवी मुंबईअभ्यासाचा तगादा लावणार्‍या आईची गळा आवळून हत्या

अभ्यासाचा तगादा लावणार्‍या आईची गळा आवळून हत्या

Subscribe

१५ वर्षांच्या मुलीला अटक

आपल्याला जे करता आले नाही ते मुलांनी करावे असे पालकांचे विचार आता मुलांच्या मनात बिंबत नसून मानसिकतेच्या विवंचनेतून मुलीनेच आईचे जीवन संपविण्याचा प्रकार ऐरोलीत घडला आहे. अभ्यास करण्यासाठी सतत तगादा लावणार्‍या आईची मुलीनेच कराटेच्या कापडी पट्ट्याने गळा आवळून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

30 जुलै रोजी नवी मुंबईतील ऐरोली, सेक्टर-7 मध्ये राहणार्‍या एका 15 वर्षीय मुलीने हे कृत्य केले आहे. विशेष म्हणजे आपल्या आईची हत्या केल्यानंतर आईने आत्महत्या केल्याचे भासविण्यासाठी सदर मुलीने बेडरुमचा दरवाजा आतून बंद करून आईच्या मोबाईल फोनवरूनच आपल्या नातेवाईकांना आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठविल्याचे देखील तपासात आढळून आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर मुलीनेच आईचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. नवी मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या घटनेची माहिती दिली.

- Advertisement -

मृत महिलेचे नाव शिल्पा जाधव (41) असे असून त्या ऐरोली सेक्टर-7 मधील राकेश सोसायटीत पती संतोष जाधव (44) आणि 15 वर्षीय मुलगी तसेच 6 वर्षांचा मुलगा यांच्यासह राहात होती. आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे अशी शिल्पा जाधव आणि संतोष जाधव या दोघांची इच्छा होती. मुलीने दहावीत 92 टक्के गुण प्राप्त केले होते. त्यामुळे पालकांनी विज्ञान शाखेला प्रवेश घेऊन मुलीला वैद्यकीय प्रवेशासाठी लागणार्‍या नीट परीक्षेचा महागडा क्लास सुद्धा लावला होता. अनेक गोष्टीत पारंगत असलेल्या मुलीला स्वरक्षणासाठी कराटेचे धडे देखील दिले होते. मात्र, मुलीच्या अपेक्षा आणि स्वप्नांचा विचार न करता मुलीने डॉक्टर व्हावे ही इच्छा आईचा जीव घेऊन गेली. सातत्याने अभ्यासासाठी आईचा तगादा मुलीला सहन न झाल्याने पोटच्या मुलीनेच आईला ठार मारले.

पिढीमधील अंतराचा पालकांनी विचार केला पाहिजे. मुलाच्या भविष्याबाबत सतर्क असताना त्यांची आवड आणि क्षमता याचा विचार केला पाहिजे. आधुनिक युगातील मुलांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवून त्यांच्या कलेला पुढे नेले पाहिजे. जेणेकरून मुलांमध्ये आणि पालकांमध्ये दुरावा निर्माण होऊन गुन्हेगारी कृत्य घडेल याची सर्व पालकांनी खबरदारी घेतली पाहिजे.
-सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-१

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -