मुंबई : भायखळा येथील राणीच्या बागेतील (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय) डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे तीन कोटी रुपये खर्चून महापालिकेने नूतनीकरण केले आहे. तब्बल चार वर्षांनंतर या संग्रहालयाचे दरवाजे पर्यटकांसाठी आज, गुरुवारी (9 जानेवारी) सकाळपासूनच उघडे झाले. मात्र 2003 पासून संग्रहालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या बजाज प्रतिष्ठान आणि महापालिकेच्या समन्वयाने संग्रहालयाचे प्रवेश शुल्क यापूर्वी जे 10 रुपये होते ते आता दोन पट वाढ करून तिप्पट म्हणजे 30 रुपये इतके करण्यात आले आहे. मात्र तरीही या संग्रहालयात आज सकाळपासून सायंकाळपर्यंत पुन्हा एकदा देशी-विदेशी पर्यटक आणि शालेय विद्यार्थी आदी 875 पेक्षाही जास्त पर्यटकांनी गर्दी केल्याचे निदर्शनास आले. (Dr. Bhau Daji Lad Museum ticket fee hike Still citizens respond well)
आज पहिल्याच दिवशी भेट देणाऱ्या अनेक पर्यटकांनी आपले मोबाइल खिशातून आणि महिलांनी पर्समधून काढून संग्रहालयातील मूर्ती, पुरातन वस्तू यांचे धडधड फोटो काढले, तर कोणी तेथे व्हिडीओ शूटिंग काढून मोबाइल कॅमेऱ्यात बद्ध केले. संग्रहालयाची नूतनीकरण करण्यापूर्वी म्हणजे चार वर्षांपूर्वी याच संग्रहालयात दररोज एक हजार किंवा त्यापेक्षाही थोडे अधिक पर्यटक भेट देत असत. त्यामुळे डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयात चार वर्षाच्या कुलूपबंदी नंतरही पर्यटकांची गर्दी होऊ लागल्याने भाऊ दाजी लाड संग्रहालयाला आगामी काळात ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मुंबईतील ऐतिहासिक पुरातन वस्तूंचा ठेवा, मुंबई शहराच्या हद्दी दर्शविणारे दुर्मिळ नकाशे, शिल्प कला, जुन्या मूर्ती, बारा बलुतेदार, देवदेवता, अवतार पुरुष, भारतीय, मुंबईकर संस्कृती, मुंबईतील सागरी जीवन, शिवकालीन शस्त्रे आदींची माहिती डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयात उपलब्ध आहे. 2003 मध्ये मुंबई महापालिकेने हे संग्रहालय एका सामंजस्य कराराअन्वये ‘जमनालाल बजाज प्रतिष्ठान आणि इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (इन्टॅक)’ यांच्या ताब्यात सांभाळायला दिले. त्यावेळी बजाज प्रतिष्ठान यांनी महापालिकेकडे दोन कोटी रुपये जमा केले होते, असे सांगण्यात येते. या नूतनीकरण केलेल्या संग्रहालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी मोठ्या दिमाखात पार पडले. या संग्रहालयाच्या नूतनीकरण कामासाठी मुंबई महापालिकेने तब्बल तीन कोटी रुपये खर्च केले असल्याची माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कालच्या कार्यक्रमात दिली होती.
हेही वाचा – Drone for Illegal Fishing : राज्यातील अनधिकृत मासेमारीवर राहणार ड्रोनची नजर, काय म्हणाले नितेश राणे?
सकाळपासूनच संग्रहालयात पर्यटकांची मोठी गर्दी
संग्रहालयाच्या नूतनीकरणानंतर आज पहिल्याच दिवशी पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद लाभला. देशी-विदेशी पर्यटक आणि शालेय विद्यार्थी हे संग्रहालयाला भेटी देत आहेत. सायंकाळी 4.30 पर्यंत संग्रहालयात अंदाजे 700-800 पर्यटकांनी भेटी दिल्या होत्या. आणखीन काही कालावधीत पर्यटकांची संख्या वाढेल. तसेच, आगामी काळातही संग्रहालयाला आणखीन चांगला प्रतिसाद लाभेल, असे वाटते.
सुंदर संग्रहालय बनविले – पर्यटक
आम्ही ठाणे येथून हे संग्रहालय बघायला आलो आहोत. मध्यंतरी सुद्धा राणीच्या बागेत आलो होतो, मात्र त्यावेळी दुरुस्तीच्या कामामुळे हे संग्रहालय बंद होते. आता नूतनीकरण झाल्यानंतर आम्ही आज येथे आलो असता संग्रहालय सुंदर बनविले असल्याचे दिसून येते, अशी प्रतिक्रिया करण राजपूत (19), नरेंद्र राजपूत (17), सनी परमार (26) या तीन पर्यटकांनी दिली.
हेही वाचा – Torres Scam : टोरेस कंपनीबाबत महेश सावंत यांचे पोलीस आयुक्तांना पत्र, उपस्थित केले प्रश्न
पुणे येथील 800 विद्यार्थ्यांची भेट
दरम्यान, आम्ही पुणे, शिरूर येथील श्री. भैरवनाथ विद्यालयातून इयत्ता 5 वी ते 10 वी च्या 80 विद्यार्थ्यांना घेऊन राणीच्या बागेत पर्यटनासाठी आलो आहोत. यानंतर हे संग्रहालय विद्यार्थ्यांना दाखविण्यासाठी आणले आहे, अशी माहिती एका महिला शिक्षिकेने दिली.