त्या ड्रायव्हरने सोडली होती तंबाखू

best bus

बेस्ट बस चालवताना ह्दयविकाराचा झटका आलेला बस चालक हरिदास पाटील हा मृत्यूच्या दारातून परतला होता. बेस्टमध्ये स्वस्थ ह्दय अभियानाअंतर्गत ह्दय विकाराची जोखीम असलेल्या कर्मचाऱ्याला सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. हरिदास पाटील यांनी या अभियानाअंतर्गतच २०१७ मध्ये तंबाखूचे व्यसन सोडले होते. तसेच नियमित वैद्यकीय तपासणीमध्ये या चालकाला मधूमेह दिसून आला आहे. या कर्मचाऱ्यांवर योग्य तो उपचार करण्यात आला होता. त्यामुळेच गाडीवर असताना ह्दय विकार येऊनही हा चालक थोडक्यात बचावला.

बेस्टच्या कर्मचाऱ्यांमध्ये तंबाखूचे वाढते व्यसन पाहता गेल्या काही वर्षांमध्ये या व्यसनमुक्तीसाठीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. तंबाखूच्या व्यसनासोबतच ह्दयविकाराचे प्रमाणही वाढत असल्याचे बेस्टच्या कर्मचाऱ्यांमध्ये दिसून आले होते. स्थूल होणारे कर्मचारी आणि मधुमेहाचा विकार वाढणारे कर्मचारीही बेस्ट उपक्रमात दिसून आले आहेत. बेस्टच्या सर्वेक्षणात ८ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांमध्ये स्थूलतेचे प्रमाण दिसून आले होते.

तंबाखू व्यसन आणि मधूमेह ह्रदय विकाराचे प्रमुख जोखीम घटक आहेत. बेस्टच्या स्वस्थ ह्रदय अभियानांतर्गत संबंधित बसचालकाच्या दोन्ही घटकांवर योग्य उपचार करण्यात आले होते म्हणून तो त्या ह्रदय विकाराच्या झटक्यातून सुखरूप वाचू शकले असे मत बेस्टच्या वैद्यकीय विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी अनिल कुमार सिंघल यांनी व्यक्त केले आहे. बेस्टमध्ये नियमितपणे कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येते. बेस्टमध्ये स्वस्थ ह्रदय अभियानांतर्गत ह्रदय विकाराच्या जोखीम घटकाला सुधरविण्यात येते. म्हणून गेली ५ वर्षात कर्मचार्यांमध्ये एंजिओप्लॅस्टी आणि बायपासच्या शस्त्रक्रियांच्या प्रमाणात लक्षणीय घट दिसून आली आहे. बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीत ७७२ कर्मचाऱ्यांना मधुमेह, ४८० जणांना रक्तदाब, ४५८ जणांना कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे.