अमली पदार्थ तस्कराला अटक

Drug

मुंबई । अमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग पुरवणार्‍यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली असून वांद्रे युनिटने अंधेरी परिसरातून शुक्रवारी एका एजंटला अटक केली. त्याच्याकडून २० लाख रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील कामा रोडवर सबीर हनिफ खान (32) हा अमलीपदार्थ विरोधी पथकाला आढळला. त्याच्या हातात एक बॅग होती. त्याच्या हालचाली पाहून पोलिसांना संशय आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल खैरे आणि त्यांच्या पथकाने त्याची चौकशी केली असता त्याच्याजवळ तब्बल 1 किलो 5 ग्रॅम एमडीचा साठा सापडला. त्यांची २० लाख रुपये इतकी किंमत आहे. या कारवाईमुळे पश्चिम उपनगरातील ड्रग्ज पेडलर्सचे धाबे दणाणले आहे. हा आरोपी जोगेश्वरीच्या युसुफ बाबा चाळीमधील रहिवाशी असून ड्रग्स पुरवण्याचे काम करत होता. अमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख शिवदीप लांडे यांनी यापूर्वीही अनेक विभागात धाडी टाकल्या होत्या. त्यांच्या या सातत्यपूर्ण कारवाईमुळेच अमली पदार्थ पुरवणार्‍यांना चाप बसला होता.