घरताज्या घडामोडीप्रलंबित देयकांची माहिती लिखित स्वरुपात द्या - औषध पुरवठादारांची मागणी

प्रलंबित देयकांची माहिती लिखित स्वरुपात द्या – औषध पुरवठादारांची मागणी

Subscribe

सरकारी हॉस्पिटलमध्ये २० दिवसांपासून औषधा पुरवठा केला नाही आहे. २० दिवस उलटूनही या संपावर तोडगा निघालेला नाही आहे.

सरकारी हॉस्पिटलमध्ये औषध पुरवठा न करण्याचा रविवारी २० वा दिवस होता. गेल्या २० दिवसांपासून आपल्या प्रलंबित देयकामुळे औषध पुरवठादारांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये औषध पुरवठा केला नाही आहे. त्यामुळे, हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा भासत असल्याचं सांगितलं जात आहे. २० दिवस उलटूनही या संपावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे, प्रलंबित देयकांची माहिती ही लिखित स्वरुपात द्यावी अशी मागणी औषध पुरवठादारांकडून करण्यात आली आहे.

गेली पाच वर्ष अशीच आश्वासन दिली जात असून…

प्रलंबित देयकांचे लेखा परिक्षण सुरू असून नियमात बसणारी देयकांची रक्कम देण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. पण, गेली पाच वर्ष अशीच आश्वासन दिली जात असून हे आश्वासन लिखित स्वरुपात हवे असल्याचे औषध पुरवठादार संघटनांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, यावर करण्यात आलेले लेखा परिक्षण कोणत्या पद्धतीनुसार केले अशीही विचारणा संघटनेकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

आता तोंडी आश्वासनाला बळी पडणार नाही

शिवाय सतत देण्यात येणाऱ्या आश्वासनांमधून अशीच फसवणूक केली जात असल्याचा आरोप संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी केला आहे. औषधांची टंचाई असताना आमच्याकडून अतिरिक्त औषधे घेतली होती. पण बिलांची थकलेली रक्कम देताना आश्वासनांपलीकडे काहीही मिळत नाही. पण आता तोंडी आश्वासनाला बळी पडणार नाही. ४० औषध पुरवठादारांनी हा औषध पुरवठा बंद केला असून आपण एकत्रित लढा देत असल्याचं ही स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे लेखी आश्वासन मिळेपर्यंत कोणत्याही राज्यसरकारी हॉस्पिटलमध्ये औषध पुरवठा करणार नसल्याची माहिती ऑल फुड अॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी दिली.

थकीत रक्कम औषध पुरवठादारांना देण्यात येईल

दरम्यान, सध्या कोणत्याच राज्य सरकारी हॉस्पिटलमध्ये औषधांची कमतरता नसल्याचं वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. हॉस्पिटलमध्ये तीन महिने पुरेल इतका साठा उपलब्ध असून हाफकिनकडून अतिरिक्त तीन महिन्यांच्या औषधांचा साठा मागवला आहे. आठवड्याभरात औषधे हॉस्पिटलमध्ये येतील. तसंच, अर्थसंकल्पानंतर निधी उपलब्ध झाल्यावर ऑडीट मधून समोर आलेली थकीत रक्कम औषध पुरवठादारांना देण्यात येईल असेही डॉ. लहाने यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं.

- Advertisement -

का थांबवला औषध पुरवठा?

औषध पुरवठा दारांनी ६० कोटी रुपयांची थकीत बिले असल्याने गेल्या २० दिवसांपासून सरकारी हॉस्पिटलमध्ये औषध पुरवठा बंद केला आहे. औषध पुरवठादारांनी औषध पुरवठा बंद केल्यानंतर औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या थकलेल्या बिलांच्या रकमेसाठी लेखा परिक्षणाचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राज्यसरकारच्या सर्वात मोठ्या जे.जे हॉस्पिटलमधून जवळपास सहा कोटी रुपयांची थकबाकीसह अन्य हॉस्पिटलची मिळून एकूण २० कोटी रुपयांची थकबाकी निघाली आहे. मात्र, औषध संघटनांनी ६० कोटी रुपये थकले असल्याचं स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा – जागतिक महिला दिनी केईएममध्ये फक्त महिला करणार रक्तदान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -