घरमुंबईमद्यपान करुन धिंगाणा घालतो म्हणून केला खून

मद्यपान करुन धिंगाणा घालतो म्हणून केला खून

Subscribe

भांडुप येथे मद्यपी तरुणाची मारहाण करुन हत्या करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मद्यपाण करून धिंगाणा घालतो म्हणून हा खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केले आहे.

भांडुप येथे एका २७ वर्षांच्या मद्यपी तरुणाची दोघांनी बेदम लाथ्याबुक्यांनी मारहाण करुन हत्या केली. मिलिंद अवतार असे या मृत तरुणाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी दोन्ही मारेकरी सिंटू ग्यासुदीन शेख आणि संदीप रामअकबाल सिंग यांना भांडुप पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मद्यप्राशन करुन गोंधळ घालतो या कारणावरुन ही हत्या झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खाडे यांनी सांगितले.

कशी घडली घटना

ही घटना दोन दिवसांपूर्वी भांडुपच्या लेक रोडवरील भीड कंपनीसमोर घडली. मिलिंद हा याच परिसरात राहतो. सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजता तो मद्यप्राशन करुन भीड कंपनीसमोर आला होता. यावेळी त्याने मद्यप्राशन करुन तिथे धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला. याच परिसरात सिंटू याचा नारळ विक्रीचा व्यवसाय आहे. व्यवसायाच्या ठिकाणी मद्यप्राशन गोंधळ घालतो म्हणून त्याने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर सिंटूसह संदीप सिंग यांनी मिलिंदला बेदम मारहाण केली. लाथ्याबुक्यांनी मारहाण केल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खाडे यांच्या पथकाने पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -