घरमुंबईपावसामुळे रुग्णांचे हाल, नातेवाईक बेहाल

पावसामुळे रुग्णांचे हाल, नातेवाईक बेहाल

Subscribe

पाणी तुंबले असल्यामुळे केईएम, टाटा आणि सायन हॉस्पिटलमध्ये जाणार्‍या रुग्णांना पाण्यातून वाट काढावी लागली. दरम्यान, प्रचंड पाऊस आणि लोकलची विस्कळित झालेली वाहतूक यामुळे हॉस्पिटलमध्येही उपचारासाठी आलेल्या रुग्णांमध्ये मंगळवारी लक्षणीय घट झाली होती.

सलग चार दिवस पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांचे हाल झाले असले तरी हॉस्पिटलमध्ये जाणार्‍या रुग्णांना मंगळवारी अधिक त्रास सहन करावा लागला. विविध ठिकाणी पाणी तुंबल्याने हॉस्पिटलला पोहचण्यासाठी वेळ लागला. तसेच रेल्वे स्थानकाबाहेरही पाणी तुंबले असल्यामुळे केईएम, टाटा आणि सायन हॉस्पिटलमध्ये जाणार्‍या रुग्णांना पाण्यातून वाट काढावी लागली. दरम्यान, प्रचंड पाऊस आणि लोकलची विस्कळित झालेली वाहतूक यामुळे हॉस्पिटलमध्येही उपचारासाठी आलेल्या रुग्णांमध्ये मंगळवारी लक्षणीय घट झाली होती.

संगमनेरला राहणार्‍या चंद्रभागा रोकडे (वय ६२) यांना टाटा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी मंगळवारी डॉक्टरांनी बोलवले होते. त्यांच्यावर रेक्टमची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मी व माझा मुलगा सकाळी ६ वाजता आपल्या मुलासोबत टाटा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी संगमनेरहून निघालो. आमची गाडी सकाळी १० वाजता आसनगावला पोहचली. त्यानंतर आम्ही परळला येण्यासाठी लोकल पकडली पण सतत होणार्‍या पावसामुळे रेल्वेरुळावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. या पाण्यामुळे पाऊण तासाच्या प्रवासाला आम्हाला तब्बल साडेतीन तास लागल्याचे चंद्रभागा रोकडे यांनी ‘दै.आपलं महानगर’ला सांगितले. पाऊस पडत असल्याने कुर्ला येथे राहणार्‍या रहेला बीबी (वय ५०) या घरातून सकाळी लवकर निघून केईएम रुग्णालयात आल्या. पण नंतर तुंबलेल्या पाण्यामुळे त्यांना घरी जाणे अशक्य झाले. त्या आपल्या पतीसह बराच वेळ परळ स्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यावर खोळंबल्या होत्या. सतत कोसळणार्‍या पावसामुळे मंगळवारी हॉस्पिटलमध्ये येणार्‍या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. जे.जे., केईएम व नायर हॉस्पिटलमध्ये रोज येणार्‍या रुग्णांच्या तुलनेत मंगळवारी फारच कमी रुग्ण उपचारासाठी आले.

- Advertisement -

रविवारी हॉस्पिटल बंद असल्याने सोमवारी बर्‍यापैकी रुग्ण आले होते. मात्र मंगळवारी सकाळपासून होत असलेला जोरदार पाऊस व प्रसारमाध्यमांतून आवश्यकता असेल तरच बाहेर पडा असा संदेश देण्यात येत असल्यामुळे रोजच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत घट झाली होती.
– डॉ. मुकुंद तायडे, प्रभारी अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय

रुग्णांचे आकडेवारी
बाह्यरुग्ण दाखल                रुग्ण नियमित                    बाह्यरुग्ण
जे.जे. हॉस्पिटल                1664 69                       3500
नायर हॉस्पिटल                 400 86                        700
केईएम हॉस्पिटल              1460 28                       3000

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -