घरमुंबईउशीर झाल्याने सहा विद्यार्थी परीक्षेला मुकले

उशीर झाल्याने सहा विद्यार्थी परीक्षेला मुकले

Subscribe

मुंबई विभागात सहा तक्रारी ,पहिल्या पेपरला 75 कॉपीची प्रकरणे

परीक्षा केंद्रावर वेळेपेक्षा अर्धा तास लवकर येण्याची सूचना बोर्डाने देऊनही उशिरा आलेल्या सहा विद्यार्थ्यांवर परीक्षेला मुकण्याची वेळ आली. हे विद्यार्थी 11.30 वाजता परीक्षा केंद्रावर आल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. या विद्यार्थ्यांना आता पुरवणी परीक्षेला बसता येणार आहे. राज्यभरात पहिल्या दिवशी कॉपीची 75 प्रकरणे उघड झाली आहेत. यामध्ये औरंगाबादमध्ये 26 तर नाशिकमध्ये 18 प्रकरणे समोर आली आहेत. तर लातूर आणि कोकण विभागात एकाही कॉपीचा प्रकार नोंद झालेला नाही.

बारावीचा इंग्रजीचा पहिला पेपर गुरुवारी झाला. परीक्षेला वेळेच्या अर्धा तास लवकर येण्याच्या सूचना देण्यात आला होत्या. त्यानुसार साडेदहा वाजता त्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देण्यात आला. परीक्षा 11 वाजता सुरू झाल्यानंतरही अनेक विद्यार्थी येत होते. 11 वाजून 20 मिनिटांपर्यंत आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरील प्रमुखांकडून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत होता. परंतु त्यानंतर परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारण्यात आला. याबाबत सहा विद्यार्थ्यांनी मुंबई विभागीय मंडळाकडे तक्रारी केल्या असता मंडळाने त्या मुलांचे कारण समजून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश परीक्षा केंद्रांना दिले. परंतु 11 वाजून 20 मिनिटांनी आलेल्या सहा मुलांना प्रवेश नाकारण्यात आल्याने त्यांना परीक्षेला मुकावे लागले. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जावू नये, यासाठी घेण्यात येणार्‍या पुरवणी परीक्षेला त्यांना बसता येणार असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव शरद खंडागळे यांनी दिली. पहिल्याच पेपरला राज्यात तब्बल 75 कॉपी प्रकरणेही उघडकीस आली. यामध्ये पुणे 1, नागपूर 11, औरंगाबाद 26, मुंबई 1, कोल्हापूर 1, अमरावती 17, नाशिक 18, लातूर आणि कोकण विभागामध्ये एकही प्रकार नोंद झालेला नाही.

- Advertisement -

मोबाईल फेकला गटारामध्ये
परीक्षा केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असताना रुईया कॉलेजमध्ये एका विद्यार्थिंनी मोबाईल घेऊन आली होती. मुलीला मोबाईल नेण्यास परवानगी नाकारल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थिनीने मोबाईलमधील सीम कार्ड काढून तो गटारात फेकला. यामुळे रुईया कॉलेजमध्ये थोडेसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी उपस्थित पालकांनी मोबाईल ही सध्या काळाची गरज आहे. मुलांची काळजी घेण्यासाठी मोबाईल आवश्यक असल्याचे सांगत परीक्षा केंद्राच्या आवारात विद्यार्थ्यांना मोबाईल ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -