टाकाऊ पासून टिकाऊ! ५ लाख टेट्रा पॅक्सपासून तयार करणार शाळांसाठी बेंचेस

कचऱ्याचे वर्गीकरण आणि पुनर्वापर यांबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न

Durable from waste! 5 lakh Tetra Pax to build benches for schools
टाकाऊ पासून टिकाऊ! ५ लाख टेट्रा पॅक्सपासून तयार करणार शाळांसाठी बेंचेस

वसुंधरा दिनाच्या निमित्ताने टेट्रा पॅकचा वापर करुन ५ लाख पॅक्स रिसायकल करुन त्यापासून माहीम येथील सिटी ऑफ लॉस एंजेलिस या पालिकेच्या शाळेसाठी बेंचेस बनवून देण्यात येणार आहेत. ‘कार्टन्स ले आओ, क्लासरूम बनाओ’ या फ्लॅगशिप अभियानांतर्गत ५ लाख वापरलेले कार्टन पॅकेजेस गोळा करण्यात आले. या अभियानाला मुंबई महापालिकेने पाठिंबा दिला आहे. टेट्रा पॅकपासून तयार करण्यात आलेले बेंचेस दिसायला सुंदर, मजबूत आणि टिकाऊ आहेत. कचऱ्याचे वर्गीकरण आणि पुनर्वापर यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे.

‘कार्टन्स ले आओ, क्लासरूम बनाओ’ या उपक्रमाची आम्ही प्रशंसा करतो. यामध्ये पेयांच्या वापरलेल्या कार्टन्सचे रिसायकलिंग करून सरकारी अनुदानित शाळांसाठी बेंचेस तयार केले जाणार आहेत. जी नॉर्थ प्रभागातील माहीम पश्चिम भागातील सिटी ऑफ लॉस एंजेलिस स्कूल ही मुंबईतील महापालिकेद्वारे चालवली जाणारी पहिली सीबीएसई शाळा आहे. या अभियानामुळे आमच्या विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगले अध्ययन वातावरण तयार करण्यात मदत होईल, याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. सर्व मुंबईकरांनी पुढे यावे आणि या अभियानाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन जी नॉर्थचे सहाय्यक आयुक्त किरण एस दिघावकर यांनी केले.

टेट्रा पॅकने २०१० साली सुरु केलेल्या गो ग्रीन विथ टेट्रा पॅक कार्यक्रमाच्या अभियानाचा हा एक भाग आहे. ज्यूस, दूध, ओआरएस व अन्य पेयांची वापरलेली कार्टन्स नजीकच्या सहकारी भांडार/रिलायन्स फ्रेश स्टोअर्समध्ये किंवा या कार्यक्रमासाठी डिपॉझिट पॉइंट्स म्हणून निश्चित करण्यात आलेल्या २०० हून स्थळांपैकी कोणत्याही स्थळावर नेऊन देण्यात येतात. ही कार्टन्स संकलित केली जातात, त्यांचे गठ्ठे केले जातात. त्यानंतर पालघरमधील रिसायकलरकडे ते पाठवले जातात. तेथे त्यांचे रूपांतर पॅनल बोर्डसमध्ये केले जाते. या पॅनल बोर्डसचा वापर उद्यानातील बाके, वर्गातील बेंचेस आणि अशा अनेक उपयुक्त वस्तूंमध्ये करून हे साहित्य पुन्हा समाजाला दिले जाते. एक बेंच तयार करण्यासाठी साधारणपणे ११ हजार वापरलेली कार्टन पॅकेजेस लागतात.


हेही वाचा – बंद खोलीत कोरोना संक्रमणाचा धोका कशामुळे वाढतोय? जाणून घ्या